पिंपरी (Pclive7.com):- गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा झालेला विजय हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या आर्थिक सुधारणांसाठी घेत असलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयांचा विजय असल्याची प्रतिक्रीया पिंपरी चिंचवड भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी दिली.
काँग्रेसने जीएसटी, नोटाबंदी यांसारख्या ऐतिहासिक निर्णयांबाबत नकारात्मकता तयार करून तेथील मतदारांमध्ये संभ्रमावस्था निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र मतदारांनी काँग्रेसच्या या कुटील नितीला बळी न पडता गुजरात आणि हिमाचल प्रदेशमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत देऊन जीएसटी आणि नोटाबंदीचा निर्णय योग्य आहे, यावर शिक्कामोर्तब केले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्यादृष्टीने महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या गुजरातमध्ये भाजपने सलग पाचव्यांदा विजय प्राप्त केला आहे. त्यामुळे २०१९ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीतही भाजप स्पष्ट बहुमत प्राप्त करेल, असा विश्वास आमदार जगताप यांनी व्यक्त केला.