पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांचे बंद पडलेले रेशन कार्ड चालू करावेत. तसेच रेशन दुकानात सुरू असलेले काळे धंदे थांबवण्यात यावेत. अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी दिला आहे. चिखले यांनी यासंदर्भात अन्नधान्य वितरण अधिकारी यांना निवेदन दिले आहे.
त्या निवेदन म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड शहरातील बहुसंख्य नागरीकांचे रेशन कार्ड बंद पडलेले असून त्या कारणास्तव त्यांना अन्नधान्याचा व वैद्यकीय लाभ मिळत नाही. पिंपरी चिंचवड शहरामध्ये असे निदर्शनास आले आहे कि, सर्वसामान्य कष्टकरी लोकांचे रेशन कार्ड बऱ्याच दिवसापासून बंद पडलेले आहेत, वर्षानुवर्षे रेशन कार्ड दुकानामध्ये हेलपाटे मारूनही त्यांना योग्य ती मदत केली जात नाही. तसेच अवाजवी कारणे दिली जातात, यामुळे नागरिकांचा भ्रमनिरास होत आहे. शहरातील सर्व रेशन दुकानदारांकडून सर्वसामान्य लोकांना टोलवा टोलवीची उत्तरे दिली जातात.
त्यामुळे हेच सर्व नागरिक आपल्या विभागीय कार्यालयात जातात. तिथे त्यांना कोणत्याही प्रकारे मदत केली जात नाही. या सर्व बाबींचा आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून जाहीर निषेध करतो. आमच्या असे निदर्शनास आलेले आहे कि शहरातील रेशन दुकानदार हे नागरिकांसाठी आलेल्या अन्नधान्याचा काळा बाजार करून विकतात. सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारी आमच्याकडे बऱ्याच मोठ्या प्रमाणात आलेले आहेत. तसेच दररोज या तक्रारीमध्ये वाढ होत आहे.
सध्या कुठल्याही विभागीय कार्यालयात गेले तरी सगळी प्रक्रिया ऑनलाईन करून घ्या अशी उत्तरे दिली जातात. परंतु बऱ्याच रेशन कार्ड धारकांकडे १२ आकडी क्रमांक नाही. तसेच ज्यांच्याकडे १२ आकडी क्रमांक आहे, त्यांचे ऑनलाईन पद्धतीने रजिस्ट्रेशन होत नाही. ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करताना तांत्रिक अडचणी येणे अशा असंख्य समस्यांचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. तरी वरील सर्व समस्या लवकरात लवकर दूर कराव्यात आणि शासनाच्या वतीने मिळणारा लाभ हा शेवटच्या घटकापर्यंत पोहोचला पाहिजे. अन्यथा पिंपरी चिंचवड शहरामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आंदोलन करण्यात येईल असा इशारा मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी दिला आहे.