पिंपरी (Pclive7.com):- नाशिक फाटा ते मोशी या मार्गावर मेट्रो सुरु करावी. त्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात यावा, अशा सूचना आमदार महेश लांडगे यांनी महापालिका आयुक्तांना केल्या आहेत. तसेच निगडीपर्यंतच्या मेट्रोचा अहवालही लवकर पूर्ण करण्यात यावा. त्याचबरोबर भोसरी मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावावेत. प्राधिकरणाने विविध आरक्षित असलेल्या जागा महापालिकेकडे हस्तांतरित कराव्यात, अशा सूचनाही आमदार लांडगे यांनी प्राधिकरणाच्या अधिका-यांना केल्या आहेत.
भोसरी मतदारसंघातील आणि शहराच्या विविध प्रलंबित प्रश्नांचा आमदार महेश लांडगे यांनी आज आढावा घेतला. आयुक्त दालनात झालेल्या बैठकीत महापालिका, पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण आणि औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) यांच्याशी निगडीत प्रलंबित प्रश्नांचा आढावा घेण्यात आला. या बैठकीला महापौर नितीन काळजे, स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश खडके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश अहिरराव, कार्यकारी अभियंता अनिल सूर्यवंशी, शहर सुधारणा समितीचे सभापती सागर गवळी, ‘फ’ प्रभाग अध्यक्षा साधना मळेकर, नगरसेवक राहुल जाधव, अश्विनी जाधव, कुंदन गायकवाड, स्वीनल म्हेत्रे, सारिका बोराडे, सुवर्णा बुर्डे, सोनाली गव्हाणे, भीमाबाई फुगे, यशोदा बोईनवाड, विकास डोळस, लक्ष्मण उंडे, हिराबाई घुले, निर्मला गायकवाड, सारिका लांडगे, संतोष लोंढे, राजेंद्र लांडगे, संजय नेवाळे तसेच एमआयडीसीचे सर्व अधिकारी बैठकीला उपस्थित होते.
आमदार महेश लांडगे म्हणाले, “पहिल्याच टप्यात मेट्रो निगडीपर्यंत धावणार आहे. त्याचा आर्थिक भार पेलण्यासाठी पालिका तयार आहे. निगडीपर्यंत मेट्रोचा सविस्तर प्रकल्प अहवाल आणि नाशिक फाटा ते मोशी या मार्गावरील मेट्रोचा सविस्तर अहवाल लवकरात लवकर पूर्ण करावा. मोशीपर्यंत मेट्रो धावल्यास वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने विविध आरक्षित असलेल्या जागा महापालिकेकडे हस्तांतरित कराव्यात. त्या जागा आम्हाला विकसित करायच्या आहेत. महापालिकेने अर्थसंकल्पात त्यासाठी तरतूदी केल्या आहेत.”
आरक्षणे विकसित केल्यावर नागरिकांना त्याचा फायदा होईल. त्यासाठी प्राधिकरणाने तत्काळ उपाययोजना कराव्यात, अशा सूचनाही आमदार लांडगे यांनी प्राधिकरणाच्या अधिका-यांना केल्या आहेत. तसेच गायरान जमिनी देखील ताब्यात घेण्याच्या सूचना आमदार लांडगे यांनी केल्या आहेत.
च-होली, दिघी, डुडुळवाडी, पठारे मळा, दाभाडे वस्ती, पठारेमळा लोहगावला जोडणारा रस्त्याच्या जागांचे पालिकेने भूसंपादन करावे. भूमिहीन होणा-या नागरिकांना आर्थिक मोबदला देण्यात यावा. वाटाघाटीने जागा ताब्यात घेण्यात याव्यात. कोणाचेही नुकसान होता कामे नये, याची पालिकेने खबरदारी घ्यावी, अशा सूचनाही आमदार लांडगे यांनी अधिका-यांना दिल्या आहेत. दिघीतील दत्तनगर ते जकात नाका येथे ३० मीटरचा पूल बांधण्यात यावा. ३० मीटरच्या चार लेन देखील होऊ शकतात. त्यामुळे हद्दीबाहेर जाणारी वाहतूक पुलावरुन जाऊ शकते. दिघीतील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच भोसरी, इंद्रायणीनगर येथे होत असलेल्या स्केटिंग ग्राऊंडचे काम चुकीच्या पद्धतीने सुरु आहे. ते आंतरराष्ट्रीय दर्जाप्रमाणे करण्यात यावे, अशा सूचनाही आमदार लांडगे यांनी केल्या आहेत.
चिखली परिसरात गुन्हेगारी वाढली आहे. चिखलीसाठी स्वतंत्र पोलीस ठाणे मंजूर झाले आहे. चिखलीतील जुन्या शाळेत पोलीस ठाणे करण्यात येणार आहे. शाळेसाठी नव्याने इमारत बांधण्यात आली आहे. परंतु, त्या जागेकडे जाण्यासाठी रस्ता नाही. ती जागा ताब्यात घेऊन रस्ता उपलब्ध करुन देण्यात यावा. शाळेचे स्थलांतर झाल्यावर त्या जुन्या शाळेच्या जागेवर पोलीस ठाणे करण्यात येणार आहे. नवीन वर्षांत पोलीस ठाण्याचे उद्घाटन केले जाणार आहे, त्यासाठी जागेचे आरक्षण लवकरात लवकर ताब्यात घेण्याच्या सूचना आमदार लांडगे यांनी अधिका-यांना केल्या आहेत.
मोशीत कच-याचे ढीग साचले आहेत. त्यामुळे वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाचे काम लवकरात लवकर सुरु करण्यात यावा. कचरा व्यवस्थापनामध्ये ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्प महत्वाचा आहे. कचरा समस्या सोडविण्यासाठी हा महत्वाचा उपाय आहे. २०१९ पर्यंत वेस्ट टू एनर्जी प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत चालू झाला पाहिजे, अशा कडक सूचना देखील आमदार लांडगे यांनी अधिका-यांना केल्या आहेत. शहरातील कच-याचा प्रश्न गंभीर होत आहे. शहरातील कचरा दररोज उचलला गेला पाहिजे. कचरा उचलण्यासाठी मनुष्यबळ कमी असले तर मनुष्यबळ वाढवावे, असेही लांडगे यांनी सांगितले.
आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, “प्राधिकरणाकडील जागा पालिकेकडे हस्तांतर करण्यासाठी प्रस्ताव पाठविले आहेत. आरक्षणे ताब्यात घेण्याची प्रक्रिया वेगात सुरु आहे. जागा ताब्यात घेऊन आरक्षणे विकसित करण्यात येणार आहे. आमदार महेश लांडगे यांनी सांगितलेली सर्व कामे वेगात करण्यात येत आहेत. निगडीपर्यंत मेट्रोचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम सुरु आहे. नाशिक फाटा ते मोशी या मार्गावरील मेट्रोचा सविस्तर अहवाल देखील तयार करण्यात येईल.”