पिंपरी (Pclive7.com):- कर्मचाऱ्याने उद्धट वर्तन केल्याबाबत त्याला नोटीस दिली. याचा राग मनात धरून सहायक आरोग्य अधिकाऱ्याला मारहाण केली. याप्रकरणी माजी नगरसेविकेच्या पतीसह तिघांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. भोसरी येथील ‘ई’ क्षेत्रीय कार्यालयात मंगळवारी (दि.५) दुपारी ही घटना घडली.
राजेश नंदलाल भाट (५४, रा. थेरगाव) यांनी याप्रकरणी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार शंकर मुरलीधर सोनवणे (३२, रा. बोपखेल गावठाण), संतोष लांडगे (४५) यांच्यासह एका अनोळखी व्यक्तीविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला, संतोष लांडगे हे भाजपच्या माजी नगरसेविका सारिका लांडगे यांचे पती आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राजेश भाट हे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ई-क्षेत्रीय कार्यालयात सहायक आरोग्य अधिकारी पदावर कार्यरत आहेत. त्यांनी शंकर सोनवणे यास विनापरवाना गैरहजर आणि उद्धट वर्तनाबाबत नोटीस बजावली होती. त्याचा राग मनात धरून त्याने इतर साथीदारांना घेऊन येत राजेश भाट यांना शिवीगाळ केली.