पिंपरी (Pclive7.com):- आकुर्डी गावचे ग्रामदैवत श्री खंडोबा देवाची मंगळवारी (दि.१६) आणि बुधवारी (दि.१७) रोजी यात्रा भरणार आहे. यात्रेसाठी लाखो भाविक खंडोबा माळ चौकातील खंडोबा मंदिरात दर्शनासाठी येत असतात. या पार्श्वभूमीवर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी खंडोबा माळ चौकाकडे येणाऱ्या वाहतुकीत बदल केला आहे.
यात्रेनिमित्त वाहतुकीत केलेला हा बदल मंगळवारी आणि बुधवारी पहाटे ५ ते रात्री १० वाजतापर्यंत असणार आहे. वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विवेक पाटील यांनी याबाबतचे आदेश दिले. वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन केले आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
वाहतुकीत करण्यात आलेत ‘हे’ बदल..
■ थरमॅक्स चौकाकडून येणारी वाहतूक आर.डी.आगा मार्गाकडून गरवारे कंपनी कंपाऊंडपर्यंत येऊन तेथील टी जंक्शनवरून खंडोबामाळ चौकाकडे न जाता डावीकडून परशुराम चौकातून मोहननगर चिचवडमार्गे इच्छितस्थळी जातील.
■ परशुराम चौकाकडून येणारी वाहतूक खंडोबामाळ चौकाकडे न येता ती परशुराम चौकातून आर.डी.आगामार्गे गरवारे कंपनी कंपाऊंड टी जंक्शनवरून उजवीकडे वळून इच्छित स्थळी जातील.
■ चिंचवड, दळवीनगर व आकुर्डी गावठा- णातून येणाऱ्या वाहनांना खंडोबामाळ चौकाकडून थरमॅक्स चौकाकडे जाण्यास प्रवेश बंद असेल.