पिंपरी (Pclive7.com):-आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यातील पोलिस निरीक्षकांच्या बदल्या झाल्या. यात पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील २७ निरीक्षकांची बदली झाली. त्यातील तीन निरीक्षकांनी या बदल्या चुकीच्या पद्धतीने तसेच नियमाला धरून नसल्याचे सांगत महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणकडे (मॅट) धाव घेतली. या बदलीच्या आदेशाला मॅटने स्थगिती दिली आहे.
पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील २७ निरीक्षकांपैकी १६ जणांची नागपूर शहर पोलिस दलात बदली झाली. निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार या बदल्या नसून, यातून अन्याय झाल्याचे सांगत तीन पोलिस निरीक्षकांनी मॅटकडे धाव घेतली. स्वगृह जिल्हा तसेच तीन वर्षे कार्यकारी पदावर कार्यरत नसतानाही बदली करण्यात आली. तसेच बदलीबाबत पूर्व कल्पना दिली नाही. तसेच बदली झाल्यानंतर रजेवर असतानाही आम्हाला तडकाफडकी ‘रिलिव्ह’ करण्यात आले, असे त्यांनी मॅटकडे म्हणणे मांडले आहे. पुढील सुनावणी नऊ फेब्रुवारी रोजी होणार आहे.
आणखी काही निरीक्षकांची मॅटकडे धाव?
पोलिस आयुक्तालयातील बदली झालेल्या आणखी काही निरीक्षकांपैकी काही जण मॅटकडे धाव घेणार असल्याची चर्चा पिंपरी- चिंचवड पोलिस दलात सुरू आहे. त्यामुळे निरीक्षकांच्या या बदलीवरून पोलिस दलात नाराजीनाट्य सुरू झाल्याचे दिसून येते. पुढील सुनावणी नऊ फेब्रुवारी रोजी होईल.