पिंपरी (Pclive7.com):- गणेशनगर, थेरगाव प्रभाग क्रमांक २४ मध्ये मध्यम वर्गीयांची संख्या लक्षणिय आहे. येथे अनेक खाजगी शाळा असून त्यांची फी देखील प्रचंड आहे. सर्वसामान्यांना ही फी न परवडणारी आहे. त्यात महापालिकेची एकही इंग्रजी माध्यमाची शाळा नसल्याने सुमारे दीड हजाराहून अधिक विद्यार्थी इंग्रजी माध्यमाच्या शिक्षणापासून वंचित रहात आहेत. त्यामुळे महापालिकेने या प्रभागात त्वरीत इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू करावी अशी मागणी शिवसेना नगरसेवक सचिन भोसले यांनी शिक्षणाधिकारी बी.एस.आवारे यांच्याकडे केली आहे.
भोसले यांनी दिलेल्या निवेदनात म्हटलयं की, प्रभाग क्रमांक २४ गणेशनगर, थेरगाव येथे महापालिकेच्या दोन शाळा आहेत. तेथे मराठी माध्यमातून शिक्षण दिले जाते. या दोन्ही शाळेत सुमारे अकराशे विद्यार्थी आहेत. या प्रभागात मध्यम वर्गीय नागरिकांची संख्या लक्षणिय आहे. येथील नागरिकांची आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाचे शिक्षण देण्याची तीव्र इच्छा असते. परंतू खाजगी शाळाची प्रचंड असलेली फी त्यामुळे त्यांना त्यांच्या पाल्यांना इंग्रजी माध्यमाचे शिक्षण देता येत नाही. यासर्व गोष्टींचा विचार करता नागरिकांच्या व विद्यार्थ्यांच्या हितार्थ इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू करणे अत्यंत गरजेचे झाले आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक जीवन अतिशय स्पर्धात्मक झाले असल्यामुळे इंग्रजी माध्यमाचे शिक्षण विद्यार्थ्यांचे उज्वल भविष्य घडविण्यासाठी खूप महत्वाचे ठरणार असल्याचे नगरसेवक भोसले यांनी म्हटले आहे.