पिंपरी (Pclive7.com):- कंजारभाट समाजातील नववधूची कौमार्य चाचणी या अनिष्ट प्रथेविरुद्ध व्हॉट्सअँपच्या माध्यमातून आवाज उठविणा-या तरुणांना समाजातीलच अन्य तरुणांकडून बेदम मारहाण करण्यात आली आहे. याप्रकरणी प्रशांत अंकुश टिंबरेकर (वय २५, रा. येरवडा), याने पिंपरी पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या फिर्यादीनुसार पाच जणांसह त्यांच्या अन्य ४० साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सनी मलके (२५ वर्षे), विनायक मलके, (वय २२) अमोल भाट (वय २० वर्षे), रोहित रावळकर (२१ वर्षे), मेहूल तामचिकर (वय २३) आणि त्यांचे अन्य ४० साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कंजारभाट समाजात लग्नानंतर नववधूची कौमार्य चाचणी घेण्याची अनिष्ट प्रथा आजही समाजात कायम आहे. या प्रथेला समाजातील काही तरुणांनी व्हॉट्सअँपच्या माध्यमातून आवाज उठविला आहे. या तरुणांनी यासाठी # Stop The “V”Ritual या नावाने व्हॉट्सअँप ग्रुप तयार केला आहे. विवेक तामचिकर याने हा ग्रुप तयार केला आहे. फिर्यादी प्रशांत टिंबरेकर त्याचा मित्र सौरभ मछले आणि प्रशांत तामचिकर हे या ग्रुपचे सदस्य आहेत. या माध्यमातून समाजातील ही प्रथा बंद व्हावी यासाठी ते प्रयत्न करीत आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या या मोहिमेला अंधश्रद्धा निर्मुलन समितीनेही पाठिंबा दिला आहे. मात्र त्यांचे हे कृत्य त्यांच्याच समाजातील अन्य तरुणांना पटले नाही.
दरम्यान, आरोपी सनी मलके याच्या बहिणीचा विवाह होता. फिर्यादी प्रशांत व त्याचे मित्र सौरभ आणि प्रशांत तामचिकर यांना लग्नाचे निमंत्रण देऊन सनी याने बोलावले होते. काल (दि.२१) रात्री हा विवाह सोहळा पार पडला. यावेळी प्रथेनुसार नंतर जातपंचायत भरली. जात पंचायत संपल्यानंतर प्रशांत हा आपल्या आई व बहिणीला घेण्यासाठी लग्न मंडपात गेला असता तिथे आरोपी सनी व त्याचे साथीदार हे सौरभ मछले याला मारहाण करीत होते. तुम्ही कौमार्य प्रथेविरुद्ध आवाज उठवून जात विरोधी कृत्य करीत आहात असे म्हणत त्याला मारहाण सुरू होती. यावेळी प्रशांत टिंबरेकर व प्रशांत तामचिकर त्याला सोडवायला गेले असता त्यांनाही सनीसह अन्य सर्व आरोपींनी बेदम मारहाण केली.
याविरोधात प्रशांत टिंबरेकर याने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपी सनी मलके विनायक मलके, अमोल भाट, रोहित रावळकर, मेहूल तामचिकर त्यांचे अन्य ४० साथीदार यांच्या विरोधात कलम १४३,१४७, १४९, ३२३, ५०६, ४२७ अंतर्गत पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी पोलीस पुढील तपास करीत आहे.