पिंपरी (Pclive7.com):- विकसन करारनाम्यातील अटी शर्तींचा भंग करून जमीन मालकाची चार कोटी १० लाख २० हजार रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी बांधकाम व्यावसायिकाला अटक करण्यात आली आहे. हा प्रकार सन २०१७ ते २८ फेब्रुवारी २०२४ या कालावधी भोसरी येथे घडला.
मे करुणेश बिल्डर्स रितेश गुलशनमल वासवानी (वय ४४, रा. पिंपरी) असे अटक केलेल्या बांधकाम व्यवसायिकाचे नाव आहे. याप्रकरणी जगन्नाथ नामदेव शेपाळ (वय ४०, रा. दिघी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वासवानी यांनी फिर्यादी शेपाळ यांची १० हजार १८४ चौरस फूट जमीन विकसनासाठी घेतली. त्याबाबत नोंदणीकृत विकसन करारनामा करण्यात आला. त्या जागेवर एस एस प्राईड नावाने चार मजल्यांच्या गृहप्रकल्पाचे १८ महिन्यांमध्ये बांधकाम पूर्ण करणे गरजेचे असताना ते पूर्ण न करता विकसन करारनाम्यातील अटींचा भंग केला. तसेच फिर्यादी यांच्या हिश्याच्या १४ सदनिकांपैकी नऊ सदनिका फिर्यादी यांच्या संमतीशिवाय परस्पर विकून चार कोटी १० लाख २० हजार रुपयांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.