पिंपरी (Pclive7.com):- पर्यटनासाठी महाराष्ट्र टुरिझम डेव्हलपमेंट कार्पोरेशनला (एमटीडीसी) केलेले बुकिंग रद्द करण्यासाठी गुगलवर मोबाईल क्रमांक सर्च करणे नौदलातील सेवानिवृत्त व्यक्तीला महागात पडले आहे. सायबर चोरट्यांनी ‘अव्वल डेस्क अॅप्स’ डाउनलोड करण्यास सांगून मोबाइल हॅक केला. त्यानंतर खात्यातून ७ लाख ४६ हजार रुपये घेऊन फसवणूक केली.
उल्हास पंढरीनाथ गुप्ते (७९, रा. रामनगर कॉलनी, बावधन, पुणे) यांनी याप्रकरणी शुक्रवारी (दि.१) हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, मोबाईल क्रमांकधारकाच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
फिर्यादी गुप्ते हे नौदलातून सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांच्या व्हॉट्सअॅपवरील एका ग्रुपमध्ये पर्यटनाला जाण्याबाबत माहिती आली होती. त्यानुसार, पर्यटनास जाण्याचे निश्चित करून त्यांनी पैसे भरून एमटीडीसीवर नोंदणी केली. दरम्यान, तब्येत खराब झाल्याने त्यांनी नोंदणी रद्द करण्याचे ठरवले. त्यासाठी त्यांनी एमटीडीसीशी संपर्क करण्यासाठी गुगलवर सर्च केले. त्यावेळी एक मोबाईल क्रमांक त्यांना मिळाला. त्या क्रमांकावर त्यांनी संपर्क साधला. आरोपीने त्यांना ‘अव्वल डेस्क’ नावाचे अॅप डाउनलोड करण्यास सांगितले. त्यामध्ये नाव, पत्ता व बँक खात्याचा क्रमांक टाकायला सांगितला. त्यानंतर गुप्ते यांच्या मोबाईलमधील सर्व माहिती चोरून मोबाईल हॅक केला. त्यानंतर बँक खात्यातून ७ लाख ४६ हजार रुपये घेऊन त्यांची फसवणूक केली.