पिंपरी (Pclive7.com):- गांजा जवळ बाळगल्याच्या खोट्या केसमध्ये अडकवून जेलमध्ये टाकण्याची धमकी देत विद्यार्थ्याचे अपहरण करीत त्याच्या वडिलांकडून ५ लाखांची खंडणी उकळणाऱ्या त्या दोघा पोलिसांना भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ३११ नुसार शासकीय सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. तर एमडी ड्रग्स प्रकरणातील आरोपी पोलीस उपनिरीक्षक विकास शेळके याला निलंबित करण्यात आले आहे.
काही दिवसापूर्वी गांजा जवळ बाळगण्याच्या खोट्या केस मध्ये एका विद्यार्थ्याला अडकवण्यात आले होते याप्रकरणी त्या विद्यार्थ्याला धमकी देत त्याचे अपहरण करून पाच लाखांची खंडणी उकळण्यात आली होती यात देहूरोड पोलीस ठाण्यातील दोन कर्मचाऱ्यांचा समावेश होता. देहूरोड पोलीस ठाण्यात कार्यरत असणारे आणि सध्या निलंबित करण्यात आलेले पोलीस कर्मचारी हेमंत गायकवाड आणि सचिन शेजळ अशी त्या पोलिसांची नावे आहेत. या प्रकरणात दोषी आढळल्यामुळे त्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. अतिरिक्त आयुक्त वसंत परदेशी यांनी हे आदेश दिले आहेत.
तर ४५ कोटी रुपयांचे एमडी ड्रग्स विक्रीच्या प्रयत्नांत थेट सहभाग असलेल्या आणि सध्या अटकेत असलेला फौजदार विकास शेळके याला निलंबित करण्यात आले असून, पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी हे आदेश दिले आहेत.