पिंपरी (Pclive7.com):- पूर्व वैमनस्यातून टोळक्याने शिवसेनेच्या विकासनगर विभाग प्रमुखाच्या मुलाला सिमेंट ब्लॉकने मारहाण केल्याने तो जखमी झाला. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. देहूरोड परिसरात बुधवारी (दि. ६) रात्री ही घटना घडली होती. या खूनप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.
विशाल विजय थोरी (२४, रा. देहूरोड) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याचे वडील शिवसेनेचे विभागप्रमुख विजय थोरी (४७) यांनी फिर्याद दिली.
रोहन राजेश देशमुख (२३), चिक्या ऊर्फ सुयश विलास देशमुख (२६, दोघे रा. देहूरोड), अमित कैलास वरगडे (२४), वैभव शिवप्पा ओनी (२०, दोघे रा. तळेगाव दाभाडे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्यासह तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार विशाल आणि रोहन देशमुख तसेच इतरांमध्ये पूर्वी भांडण झाले होते. त्याचाच राग त्यांच्या मनात होता. त्यानंतर बुधवारी रात्री विशाल आणि त्यांच्यात पुन्हा वाद झाला. रोहन देशमुख याच्या आजीने फिर्यादी विजय थोरी यांच्या पत्नीला फोन करून ‘तेरे लड़के ने रोहन के साथ झगडा किया है, २०-२५ लडके बुलाये है, आज उसको छोंडेगे नहीं, उसको बहुत मारेंगे’ अशी धमकी दिली. तसेच राजेश देशमुख याने फिर्यादी थोरी यांना ‘तेरे लडके का बहुत नाटक हो गया है, आज उसको छोडेंगे नहीं, बहुत मारेंगे और बच गया तो उसको चौकी में जमा करेंगे,’ असे म्हणत धमकी दिली. त्यानंतर त्यांनी विशाल याला सिमेंट ब्लॉक, कुंडीने जबर मारहाण करून त्याचा खून केला होता.