पिंपरी (Pclive7.com):- खासदार श्रीरंग बारणे हे विद्यमान खासदार आहेत. ते जर मतदारसंघातील नागरिकांना ओळखत नसतील तर ही शोकांतिका आहे. त्यांना समजलं पाहिजे की ते कुणाबद्दल बोलत आहेत. कारण मी त्यांच्या मतदारसंघात राहतो. माझं मूळ गाव, जन्मभूमी आणि कर्मभूमी ही पिंपरी गाव आहे. ते चुकीचं बोलत आहेत, असं म्हणत संजोग वाघेरे यांनी बारणे यांना खोचक टोला लगावला. पुढे ते म्हणाले, ते कुठल्या पक्षातून कुठल्या पक्षात आले आहेत, हे सर्वांना माहीत आहे. त्यांनी सत्तेसाठी पक्ष सोडला. आम्ही तत्वांसाठी पक्ष सोडला. आम्ही सत्तेसाठी दुसऱ्या पक्षात गेलो नाहीत, असे खणखणीत प्रत्त्यूत्तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार संजोग वाघेरे यांनी दिली आहे.
मावळचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांनी नुकतीच संजोग वाघेरे यांच्यावर टीका करत त्यांच्यावर अधिक बोलण्यास नकार दिला होता. ‘ज्या व्यक्तीचा मावळ मतदारसंघात थांगपत्ता नाही अशा व्यक्तींवर मी बोलणार नाही. पक्षनिष्ठेबाबत त्यांनी मला सांगू नये’,असे बारणे यांनी म्हटले होते.
मावळ लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार श्रीरंग बारणे आणि शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार संजोग वाघेरे यांच्यात जुंपली आहे. दोन्ही उमेदवारांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. नुकतेच श्रीरंग बारणे यांनी संजोग वाघेरे यांच्यावर मी बोलणार नाही. त्यांचा मतदारसंघात थांगपत्ता नाही. त्यांच्यावर काय बोलू असं म्हणत टीका केली होती. यावर संजोग वाघेरे यांनी पलटवार करत सत्तेसाठी पक्ष बदलणाऱ्यांनी बोलू नये, असा टोला लगावला आहे. संजोग वाघेरे पिंपरीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
संजोग वाघेरेंच्या प्रचाराचा नारळ फुटला…
महाविकास आघाडीचे जागा वाटपाचे सूत्र निश्चित झाले नसताना उद्धव ठाकरे यांनी रायगड दौऱ्यात मावळमधून संजोग वाघेरे यांची उमेदवारी जाहीर करताच वाघेरे यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. विजय निश्चित असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता पुढील आठवड्यात लागण्याची शक्यता आहे. राजकीय पक्षांकडून निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे. ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मावळ मतदारसंघातील रायगड जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघात दौरा केला. या दौऱ्यात वाघेरे यांची उमेदवारी जाहीर केली. ते विक्रमी मतांनी विजयी होतील, असा विश्वासही ठाकरे यांनी व्यक्त केला. ठाकरे यांनी उमेदवारी जाहीर करताच वाघेरे यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये नागरिकांच्या गाठीभेटी घेण्यावर भर दिला आहे.