पिंपरी (Pclive7.com):- सात वर्षांच्या मुलीचा खून करून वडिलांनी आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी (दि.१९) पहाटे थेरगाव येथे उघडकीस आला. जागा व्यवहाराचे पैसे न मिळाल्याने ही घटना घडल्याचे स्पष्ट झाले असून, आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करत एकाला अटक करण्यात आली आहे. सुनील ऊर्फ रामराव कुयटे असे अटक केलेल्याचे नाव आहे. भाऊसाहेब भानुदास बेदरे (वय ४२) यांनी आत्महत्या केली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाऊसाहेब बेदरे आणि संशयित सुनील यांच्यात जागेचा व्यवहार झाला होता. जागा विक्री केल्यानंतर त्याचे पैसे सुनीलने भाऊसाहेब यांना दिले नव्हते. त्यातून भाऊसाहेब अडचणीत आले होते. आर्थिक चणचणीमुळे त्यांनी मंगळवारी पहाटे त्यांच्या सातवर्षीय मुलीचा दोरीने गळा आवळून खून केला. त्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली.
भाऊसाहेब यांच्या पत्नी रविवारी (दि.१७) मूळ गावी गेवराई (जि. बीड) येथे गेल्या होत्या. दरम्यान, १५ वर्षीय मुलगा, सात वर्षीय मुलगी आणि भाऊसाहेब घरी होते. पत्नी मंगळवारी पहाटे पाच वाजता गावाहून घरी आल्या असता हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. भाऊसाहेब यांनी स्वयंपाकघरातील पंख्याला गळफास घेतला होता, तर मुलीचा गळा आवळून खून करण्यात आला होता. भाऊसाहेबांनी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना आढळली. त्यामध्ये जागेच्या व्यवहारातील पैसे सुनीलने दिले नसल्याने आर्थिक विवंचनेतून आपण आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे. आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करत सुनीलला अटक केली आहे.