वडगाव मावळ (Pclive7.com):- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त (दि.३१) रोजी वडगाव जवळील मोहितेवाडी (साते) येथे शिवचरित्रावर आधारित प्रसिद्ध इतिहास संशोधक डॉ.प्रमोद बोराडे सर यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
ग्रामीण भागामध्ये बहुतांश भागात फाल्गुन कृष्ण तृतीया म्हणजेच तिथीनुसारच शिवजयंती साजरी केली जाते. मोहितेवाडी मध्ये सालाबादप्रमाणे याही वर्षी विविध कार्यक्रमाद्वारे शिवजयंती साजरी करण्यात आली. गावामध्ये दारोदारी रांगोळी पायघड्या व भगवे झेंडे लावत नागरिकांमध्ये उत्साह दिसत होता. दि.३१ रोजी हनुमान मंदिर पटांगणामध्ये डॉ.प्रमोद बोराडे सर जे इंद्रायणी महाविद्यालयामध्ये इतिहासाचे प्राध्यापक व महाराष्ट्रतील ख्यातनाम इतिहास संशोधक देखील आहे त्यांचे सुश्राव्य व्याख्यान झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष्यस्थानी भास्करआप्पा म्हाळस्कर हे होते. “तरुणांनी स्वप्न पहावे व त्यामागे ध्येयाने उठून पाठलाग करावा हेच शिवचरित्र शिकवते” असे डॉ बोराडे यांनी प्रतिपादन केले.
भास्करआप्पा म्हाळस्कर यांनी देखील वडगाव मध्ये गेली 45 वर्षे अविरत सुरु असलेल्या सरस्वती व्याख्यानमालेचे उदाहरण देत म्हणाले की, मोहितेवाडी मधील तरुणांनी सुरु केलेले व्याख्यान कार्यक्रमाचे रोपटे भविष्यात भव्य वटवृक्षाप्रमाणे वाढेल.
या कार्यक्रमाच्या प्रसंगी गावातील महिलांची संख्या मोठी होती. कार्यक्रमाचे नियोजन गावातील तरुण तरुणी यांनी एकत्र येत केले. तसेच मुंबई पोलीसमध्ये नियुक्ती झालेले नागेशजी मोहिते सर यांचा ग्रामस्थांच्या वतीने यथोचीय सन्मान झाला. कार्यक्रमाची सांगता शिववंदना घेत झाली व सर्वांचे आभार अनंता आगळमे यांनी मानले व सूत्रसंचालन श्याम मालपोटे यांनी केले.