पिंपरी (Pclive7.com):- निगडी यमुनानगर येथे गुढीपाडव्या निमित्त भारतीय संस्कृती मंचच्या वतीने उद्या ९ एप्रिल रोजी शोभायात्रा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती म्हणून भीमा-कोरेगाव हल्ल्यातील प्रमुख आरोपी मिलिंद एकबोटे यांना आमंत्रित करण्यात आले असल्याची माहिती एका प्रसिद्धी पत्राच्या माध्यमातून मिळाली आहे. पिंपरी चिंचवड शहरातील तमाम आंबेडकरवादी पक्ष संघटनांनी त्यांच्या उपस्थितीस विरोध आहे.
वंचित बहुजन युवा आघाडीचे शहर संघटक प्रमोद क्षिरसागर यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, मिलिंद एकबोटे सातत्याने प्रक्षोभक वक्तव्य करत धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रकार करत आहे. भीमाकोरेगाव हल्ला प्रकरणात त्याच्यावर मुख्य आरोप असुन चिथावणीखोर वक्तव्य करून दंगली भडकण्याची कामे केल्याचे अनेकदा प्रसिद्धी माध्यामातून प्रसिद्ध झाले आहे. लोकसभेच्या निवडणूकीच्या आचारसंहितेच्या काळात अश्या प्रकारे वादग्रस्त आरोपींना आमंत्रित करून समाजातील शांतता भंग करून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्याचा प्रयत्न आयोजकांच्या माध्यामातून केला जात आहे.
तरी तात्काळ सदर कार्यक्रमाचा परवाना नाकारावा, अन्यथा पिंपरी चिंचवड शहरातील तमाम आंबेडकरी पक्ष संघटना कार्यक्रमाच्या स्थळी मिलिंद एकबोटे विरोधात निदर्शने करतील असा इशारा वंचित बहुजन युवा आघाडीचे शहर संघटक प्रमोद क्षिरसागर, भाजपाचे शहर चिटणीस सचिन काळभोर, वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रसिद्धी प्रमुख बुद्धभूषण अहिरे, सामाजिक कार्यकर्त्या मेघा आठवले यांनी निगडी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना दिलेल्या पत्रात दिला आहे.