तळेगाव (Pclive7.com):- बंद बंगल्यात चोरी करण्यासाठी आलेल्या चोरट्यांना पोलिस उपनिरीक्षकाने हटकले, त्यावेळी चोरट्यांनी गोळीबार करत धूम ठोकली. तळेगाव दाभाडे येथे पुणे-मुंबई महामार्गावरील लिंब फाट्याजवळील कॉलनीत गुरुवारी (दि.९) दुपारी चारच्या सुमारास घडलेल्या घटनेने खळबळ उडाली आहे.
देहूरोड विभागाचे सहायक पोलिस आयुक्त देविदास घेवारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, तळेगाव दाभाडे येथील लिंब फाट्याजवळील कॉलनीत पोलिस उपनिरीक्षक शाम शिंदे यांच्या घराचे बांधकाम सुरू आहे. शिंदे तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात नेमणुकीस आहेत. बांधकामाची पाहणी करण्यासाठी ते आले होते. त्यावेळी कॉलनीतील एका बंद बंगल्याबाहेर संशयित आढळून आला. संशयिताने चेहऱ्याला मास्क लावला होता. त्यामुळे शिंदे यांनी त्याला हटकले. ‘तू कोण आहेस, येथे कशासाठी आलास, कोणाकडे आलास, कोणाला भेटायचे आहे,’ असे त्यांनी विचारले. मात्र, संशयिताने उर्मट उत्तरे दिली. ‘ए चल, तू तेरा काम कर, मै अलग टाईप का इन्सान हू’, असे तो म्हणाला. त्यानंतरही शिंदे यांनी त्याच्याकडे विचारणा केली. त्यावेळी त्याने खिशातील पिस्तूल दाखवले. त्यामुळे शिंदे यांनी आरडाओरडा केला. कॉलनीतील इतर लोकांना बोलावले. त्यांचा आवाज ऐकून बंगल्याच्या आत गेलेला चोरटा बाहेर आला. भिंतीवरून उडी मारून तो आणि बाहेर थांबलेला त्याचा साथीदार दुचाकीवरून पळून जात होते. त्याचवेळी कॉलनीतील काहीजण तेथे आल्याने दुचाकीवरील संशयिताने पिस्तूलातून एक गोळी जमिनीवर झाडली. त्यानंतर दोघेही दुचाकीवरून पळाले.
शिंदे यांनी तळेगाव दाभाडे पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक किशोर पाटील, परिमंडळ दोनचे पोलिस उपायुक्त बापू बांगर, सहायक आयुक्त देविदास घेवारे यांनी घटनास्थळी धाव घेतली. चोरटे दुचाकीवरून जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरून मुंबईच्या दिशेने पळून गेल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून माग काढण्यात येत आहे.