पिंपरी (Pclive7.com):- कुंपनच शेत खात असल्याचं जिवंत उदाहरण पिंपरी चिंचवड महापालिकेत अनुभवायला मिळत आहे. शहरातील अनधिकृत बांधकामावर हातोडा चालवणाऱ्या महापालिकेनेच मुख्य इमारतीच्या परिसरात विनापरवाना कार्यालय थाटायला सुरुवात केली आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन कार्यालय याठिकाणी थाटण्यासाठी हा उपद्व्याप पालिकेकडून सुरू आहे. सलगच्या सुट्ट्यांचा फायदा घेत महापालिकेने थेट पार्किंगमध्ये हे कार्यालय उभारायला सुरुवात केली आहे. सर्वसामान्य नागरिकाला कोणतेही बांधकाम करावयाचे असल्यास महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून परवानगी घेणे बंधनकारक आहे. जर शहरात कोठेही विनापरवाना बांधकाम सुरू असेल तर महापालिकडून त्यावर हातोडा चालवला जातो. मात्र महापालिका मुख्यालयाच्या इमारतीच्या पार्किंग मध्येच विनापरवाना हे कार्यालय उभारण्याचे काम सुरू आहे. बांधकाम विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना प्रसारमाध्यमांनी याबाबत विचारले असता त्यांनी देखील याकामाची कोणतीच परवानगी घेतली नसल्याचे सांगितले आहे.
एकीकडे शहरातील सर्वसामान्य नागरिकांच्या अनधिकृत बांधकामांवर महापालिका बुलडोजर फिरवत असताना महापालिका मुख्यालयातच विनापरवाना कार्यालय थाटले जात आहे. आता महापालिका या अनधिकृत बांधकामावर हातोडा चालवणार का? हाच खरा प्रश्न आहे.