पिंपरी (Pclive7.com):- महाराष्ट्राच्या राजकारणात,शैक्षणिक क्षेत्रात, व सामाजिक क्षेत्रात काम करत असताना पतंगराव कदमांनी नेहमीच उल्लेखनिय कामगिरी बजावली. अत्युच्च पदावर पोहोचल्यानंतरही त्यांच्या स्वभावात कधीही बदल झाला नाही. एक स्वच्छ प्रतिमेचा नेता म्हणून पतंगरावांनी आपली तत्त्वे आयुष्यभर जोपासली आणि त्यांच्या या गुणांमुळेच ते कायम समाजाभिमुख राहिले. पतंगरावांच्या अकाली जाण्याने महाराष्ट्र राज्याचे मोठे नुकसान झाले असून, त्यामुळे निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न निघणारी आहे. अशी खंत पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष अमित बच्छाव यांनी व्यक्त केली आहे.
बच्छाव यांनी प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सांगली जिल्हयातील ग्रामीण भागातील एका लहान शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या डॉ.पतंगराव कदम यांनी महाराष्ट्रातील वने, मदत व भूकंप पुनर्वसन, उद्योग, सहकार, पाटबंधारे अशी अनेक खाती यशस्वीपणे सांभाळली. रयत शिक्षण संस्थेचे विद्यार्थी असलेल्या पतंगरावांना शैक्षणिक क्षेत्राविषयी खुप आपुलकी होती. शिक्षण हे समाजपरिवर्तनाचे महत्तम साधन आहे. शिक्षणामुळे माणसाला आत्मभान येते. व त्यातूनच माणसाची अस्मिता जागृत होते असे त्यांचे मत होते. आणि त्याच ध्यासाने त्यांनी भारती विद्यापीठाची स्थापना केली. गेली पन्नास वर्षे एका ध्येयाने प्रेरित होऊन त्यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक परिवर्तनासाठी निर्धाराने पाऊल उचलले आणि अनेक अडचणींवर मात करून त्यांनी १८४ संस्थांचे ते संचालक पद सांभाळले. त्यांनी केलेले कार्य, त्यांची स्मृती राज्याला सतत प्रेरणादायी ठरेल असे बच्छाव यांनी म्हटले आहे.





















Join Our Whatsapp Group