पिंपरी (Pclive7.com):- मालवण येथील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याचे प्रकरण ताजे असताना निगडी येथे असणारे “संत तुकाराम महाराज व छत्रपती शिवाजी महाराज” यांच्या ऐतिहासिक भेटीचे भक्ती-शक्ती समूह शिल्पाला व त्याच्या चौथर्याला मोठ्या प्रमाणात तडे गेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यातून महापुरुषांची विटंबना होत असून भविष्यात येथे एखादी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सदरील तक्रारीची तात्काळ दखल घेऊन लवकरात-लवकर शिल्पाची दुरुस्ती करण्यात यावी, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मोठे जन आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी दिला आहे.

याबाबत सचिन चिखले यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, निगडी-प्राधिकरणातील भक्ती-शक्ती चौक पिंपरी-चिंचवडचे प्रवेशद्वार म्हणून ओळखला जातो. जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भेटीवर आधारित या चौकातील शिल्प प्रसिद्ध आहे. या शिल्पाची निर्मिती नाशिकचे शिल्पकार मदन गर्गे यांनी केली होती. या शिल्प समूहाची उंची वीस फूट आहे. छत्रपती शिवरायांसोबत शस्त्रधारी मावळे म्हणजेच धारकरी आणि तुकोबारायांसमवेत दिंड्या पताका घेतलेले वारकरी अशा भेटीचे दृश्य आहे. शिल्पासाठी २२ टन ब्राँझचा वापर केला गेला होता. या शिल्पाचे अनावरण ०३ मार्च २००० साली करण्यात आले होते. तेव्हापासून या स्थळाला ‘भक्ती-शक्ती चौक’ म्हणून संबोधले जाते. या शिल्पसमूहाला शिवभक्त तसेच पर्यटक मोठ्या प्रमाणात भेटी देत असतात. शिल्पाची निर्मिती होऊन अनेक वर्षांचा कालावधी उलटला आहे.
दरम्यान, आजच्या सद्यस्थितीला शिल्पाला व त्याच्या चौथर्याला मोठ्या प्रमाणात तडे गेलेले आहेत. पुतळ्याचा रंग उडालेला आहे. स्मारकाच्या स्वच्छतेसंदर्भात महापालिका प्रशासनाचे उदासीनता दिसून येत आहे. यामुळे महापुरुषांची विटंबना होत आहे. भविष्यात एखादी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. स्मारकाच्या झालेल्या दुरावस्थेसंदर्भात आम्ही अनेक वेळा पाठपुरावा केला आहे. तरी देखील महापालिका प्रशासनाकडून याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. ही अत्यंत संतापजनक बाब आहे. तरी या संवेदनशील तक्रारीची तात्काळ दखल घेऊन शिल्पाच्या दुरुस्तीचे काम लवकरात लवकर सुरू करण्यात यावे, अन्यथा येत्या शुक्रवारी म्हणजेच दि.२४/०१/२०२५ रोजी पिंपरी महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर तीव्र जन आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा सचिन चिखले यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.