पिंपरी (Pclive7.com):- गर्भवती होणं हा महिलांसाठी स्वप्नपूर्ति सोहळा असतो, आणि तो क्षण अविस्मरणीय करण्यासाठी, अनेक संस्कार-विधी करण्याची आपल्याकडे प्रथा आहे. मात्र डोहाळे जेवण आणि इतर पारंपारिक गर्भसंस्काराच्या एक पाऊल पुढे जात पिंपरी चिंचवडमध्ये गर्भवती महिलांनी चक्क ‘रॅम्प वॉक’ केला.
चिंचवडमधील आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलच्या वतीने नया मेहमान ही थीम घेऊन गर्भवती महिलांचा अनोखा रॅम्प वॉक शो आयोजित केला होता. आदित्य बिर्ला हॉस्पिटलच्या ऑडिटोरिएममध्ये हा ‘फॅशन’शो पार पडला. यावेळी महिलांना प्रोत्साहित करण्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून अभिनेत्री प्रियंका यादव, उपमहापौर शैलजा मोरे, माजी महापौर मंगला कदम, माजी नगरसेविका जयश्री गावडे, डॉ. राजशेखर अय्यर, सरीता बारणे आदी उपस्थित होते.
डिझायनर्सचा फॅशनशो म्हटला की त्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन वेगळा असतो. अगदी नजाकतीने पावले टाकत रॅम्पवर कॅटवॉक करणा-या उंच, गोऱ्यापान, सुंदर तरुणी डोळ्यासमोर येतात. असेच चित्र आपण पाहतो. या फॅशन शोमध्ये चर्चा असते ती मॉडेलची आणि तिने परिधान केलेल्या वस्त्राची. पण हा रॅम्प वॉक गर्भवती महिलांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी आयोजित करण्यात आला होता. यामध्ये गर्भवती महिलांनी आपल्या कला सादर केल्या. तर काहींनी आपल्या चिमुकल्यांसह रॅम्प वॉक करत या कार्यक्रमाला चार चांद लावले. हा अनोख्या ‘रॅम्पवॉक’ फॅशन वर्तुळात चांगलाच चर्चेचा ठरला. गरोदर असूनही रॅम्पवर तेवढयाच ऐटीत आणि आत्मविश्वासाने उतरलेल्या या महिलांनी मॉडेलिंग संदर्भातील सर्व संकल्पना मोडीत काढल्या.
या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून जहांगीर हॉस्पिटलच्या पीआर हेड आरती राणे, फेमिना पुणेच्या कोरिनिया मॅन्युअल, क्लिनिकल सर्व्हिसच्या मुख्य डॉ. सुजाता रावत यांनी केले. या रॅम्प वॉकमध्ये ३०० महिलांनी सहभाग घेतला.






















Join Our Whatsapp Group