पिंपरी (Pclive7.com):- इंधन दरवाढीने होरपळलेल्या जनतेवर दर कपातीची तात्पुरती मलमपट्टी करण्याचे ढोंग करण्यापेक्षा सरकारने पेट्रोल आणि डिझेल जीएसटी मध्ये समावेश करावा आणि राज्य व केंद्राने लावलेले उपकार रद्द करून सामान्य जनतेला स्वस्त पेट्रोल आणि डिझेल उपलब्ध करून द्यावे, अशा मागणीसह पिंपरी चिंचवड शहर जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने आज शहरात विविध पेट्रोल पंपावर सरकारविरोधी पत्रके वाटून जनजागरण आंदोलन करण्यात आले. सुरूवातीला दापोडीतील शहीद भगतसिंग व हुतात्मा नारायण दाभाडे यांच्या पुतळ्याला युवक काँग्रेस चे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
दापोडी,आकुर्डी, चिंचवड स्टेशन, मोशी,चिखली, भोसरी, सांगवी या ठिकाणी असलेल्या पेट्रोल पंपावर जाऊन युवक काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी हे आंदोलन केले. नागरिकांनी आंदोलनास सकारात्मक प्रतिसाद देत पत्रक स्विकारत माहिती जाणून घेतली.
या आंदोलनाला पिंपरी चिंचवड काँग्रेस अध्यक्ष सचिन साठे, शहर युवक काँग्रेस अध्यक्ष नरेंद्र बनसोडे, उपाध्यक्ष शशीकांत शिंदे, सरचिटणीस डाॅ. स्नेहल खोब्रागडे, गौरव चौधरी, अनिकेत आरकडे,सिध्दार्थ वानखेडे, अक्रम शेख,विरेंद्र गायकवाड, कुदंन कसबे,सौरभ शिंदे, पिंपरी विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष हिराचंद जाधव, भोसरी विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष नासीर चौधरी, संदेश बोर्डे आदि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.