पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाच्या वतीने सध्या कर वसुलीची जोरदार मोहीम सुरू आहे. महापालिका प्रशासन मालमत्ता कर हा ‘जिझिया कर’ वसुलीप्रमाणे जबरदस्तीने वसुली करत आहेत. मालमत्ता कर थकल्यामुळे यावर मोठ्या प्रमाणात व्याज लावले आहे. त्यामुळे मालमत्ता करावरील व्याज माफीसाठी अभय योजना राबवा, अशी आग्रही मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्याध्यक्ष विशाल बाळासाहेब काळभोर यांनी केली आहे.

याबाबत काळभोर यांनी उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार आणि महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांना निवेदन दिले आहे. त्या निवेदनात म्हटले आहे की, शहरात निवासी, व्यावसायिक, औद्योगिक, मोकळ्या जागा, मिश्र अशा 6 लाख 35 हजार नोंदणीकृत मालमत्ता आहेत. तसेच महापालिकेच्या वतीने नोंदणी नसलेल्या नवीन मालमत्ता कर कक्षेत आणण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या नव्याने नोंदणी झालेल्या मालमत्तांमधून महापालिकेला मोठ्या प्रमाणात महसूल मिळणार आहे. त्यामुळे थकीत कर वसुलीसाठी महापालिका प्रशासनाने जोर जबरदस्ती करणे योग्य नाही.
कोरोना महामारीमुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे नागरिकांचा मालमत्ता कर थकला आहे, ही वस्तुस्थिती असली तरी कोरोना महामारीतून आताशी नागरिक सावरत आहेत. मात्र, महापालिका प्रशासन मालमत्ता कर वसुलीसाठी काही प्रमाणात अतिरेक करत आहे. अनेक नागरिकांची मालमत्ता कर भरण्याची तयारी आहे. मात्र, कर आणि व्याजाची रक्कम भरणे त्यांना शक्य होत नाही. त्यामुळे नागरिकांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून व्याज माफ करण्यासाठी ‘अभय योजना’ राबविण्यात यावी, अशी मागणी काळभोर यांनी केली आहे.
शहरातील काही रहिवाशांचा एक लाखांचा मालमत्ता कर थकला आहे. मात्र, त्यावर दंड हा अडीच ते तीन लाख रुपये लागला आहे. त्यामुळे व्याज माफ करून मालमत्ता कर भरण्यासाठी नागरिकांना पार्ट पेमेंट करण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी.– विशाल बाळासाहेब काळभोरकार्याध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष.