पिंपरी (Pclive7.com):- हिंजवडी आयटी हबमध्ये काही तरुण पाकिस्तानचा झेंडा घेऊन दुचाकीवर फिरताना ‘सीसीटीव्ही’मध्ये कैद झाल्याने एकच खळबळ उडाली. पुणे शहर पोलिस ‘सीसीटीव्ही’ फुटेजचे निरीक्षण करीत असताना त्यांच्या ही बाब लक्षात आली. त्यांनी तत्काळ याबाबत पिंपरी चिंचवड नियंत्रण कक्षाला माहिती दिली. मात्र, दिवसभर शोध घेऊनही ते तरुण पोलिसांच्या हाती लागले नाहीत.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, पिंपरी चिंचवड शहरातील मुख्य चौकांमध्ये सुरू असलेल्या ‘सीसीटीव्ही’ फुटेजचे प्रेक्षपण पुणे शहर पोलिसांकडे देखील केले जाते. त्यामुळे पुणे पोलिसांकडूनही या फुटेजचे निरीक्षण केले जाते. शनिवारी, (दि.१६) दुपारी १२ च्या सुमारास हिंजवडीतील फुटेज पाहत असताना, पुणे पोलिसांना दोन अनोळखी तरुण स्प्लेंडर या दुचाकीवर पाकिस्तानचा झेंडा घेऊन परिसरात घिरट्या घालत असल्याचे दिसून आले.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेत, त्यांनी याबाबत पिंपरी चिंचवड पोलिस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. पिंपरी चिंचवड नियंत्रण कक्षाला माहिती मिळताच त्यांनी हिंजवडीसह आजूबाजूच्या पोलिस ठाण्यात अलर्ट जारी केला. त्यानुसार हिंजवडी, वाकड आणि सांगवी पोलिस ठाण्यातील पोलिसांनी त्या तरुणांचा शोध सुरू केला. पोलिसांनी सर्व परिसर पिंजून काढला. मात्र, रात्री उशिरापर्यंत त्या तरुणांचा मागमूस लागला नाही.
नियंत्रण कक्षाकडून मिळलेल्या माहितीनुसार तत्काळ टीम रवाना करण्यात आली. दिवसभरात हिंजवडीचा संपूर्ण परिसर पिंजून काढण्यात आला आहे. मात्र, नियंत्रण कक्षाकडून मिळालेल्या वर्णनाचे तरुण अद्याप हाती लागले नाहीत. त्या तरुणांच्या शोधात पोलिसांची एक टीम हद्दीमध्ये गस्त घालत आहे.
– यशवंत गवारी
वरिष्ठ पोलिस निरीक्षक, हिंजवडी पोलिस ठाणे