मावळ (Pclive7.com):- मावळ लोकसभेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ अजित पवार यांनी आज सकाळी कार्ला गडावरील एकविरा देवीचे दर्शन घेतले आहे. गेल्या महिन्यात पार्थ यांनी चिंचवडमधील मोरया गोसावी गणपतींचे दर्शन घेऊन शहरातील जेष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या होत्या.
मावळ लोकसभा मतदार मतदारसंघात पुणे जिल्ह्यातील पिंपरी, चिंचवड आणि मावळ हे तीन विधानसभा मतदारसंघ येतात. तर रायगड जिल्ह्यातील कर्जत, उरण, पनवेल हे विधानसभा मतदारसंघ येतात. रायगड जिल्ह्यात एकविरा देवीवर श्रध्दा असणारा मोठा वर्ग आहे. हे देवस्थान जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते. पार्थ पवार यांनी आज सकाळी ९ वाजता कार्ला गडावर जाऊन एकविरा देवीची पूजा करून दर्शन घेतले.
यावेळी पार्थ पवार यांच्यासोबत प्रदेश सचिव उमेश पाटील, राष्ट्रवादीचे मावळ तालुका अध्यक्ष बबनराव भेगडे, कार्याध्यक्ष दिपक हुलावळे, संत तुकाराम साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, गणेश खांडगे, किशोर भेगडे, पुणे युवकचे जिल्हाध्यक्ष सचिन घोटकुले आदी उपस्थित होते.