पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरामधून पबची पाश्चिमात्य संस्कृती हद्दपार करा, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावर उतरेल असा इशारा देण्यात आला आहे. मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चोबे आणि महापालिका आयुक्त शेखर सिंह यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले.
मनसेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, काही दिवसापुर्वी पुण्यात फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावरील एका पबमध्ये अमली पदार्थांचे सेवन होत असल्याचा व्हिडिओ समोर आला होता. त्यानंतर काही दिवसात इतर भागातील असेच व्हिडिओ समोर आले आहेत. नुकतेच पुण्यातील फक्त २३ पबला कायदेशीर परवानगी आहे आणि प्रत्यक्षात १४४ सुरु होते हि आकडेवारी उघडकीस आली आहे.
त्याच अनुषंगाने पिंपरी चिंचवड शहरातील पबची पाश्चिमात्य संस्कृती तातडीने हद्दपार करण्यात यावी. यामुळे पिंपरी चिंचवड शहरातील प्रतिमा मलिन होत आहे. वास्तविक पहाता पिंपरी चिंचवड हे विद्येचे माहेरघर आहे, तसेच सांस्कृतिक राजधानी आहे. अनेक मान्यवर प्रतिष्ठीत मंडळी या शहरात वास्तव्याला आहेत.
![](http://pclive7.com/wp-content/uploads/2024/07/IMG-20240702-WA0005-300x225.jpg)
प्रशासनाने बेकायदा पबवर कारवाई न केल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना पिंपरी चिंचवड शहर रस्त्यावर उतरून हे सगळं बंद करेल. या पबमध्ये अवैध्य धंदे सुरू असून यावर आवश्यक कायदेशीर कारवाई होत नाही. पिंपरी चिचवड महापालिकेने शहरातील हॅाटेलच्या नावाखाली पबचे अवैध्य धंदे व हॅाटेलचे अनाधिकृत बांधकामाची तसेच (टॅक्स) कराबाबतची चौकशी करून त्वरित कारवाई करावी अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली आहे.
पबमध्ये अवैध्य धंदे सुरू असलेल्या काही भागात हिंजवडी, वाकड, पिंपळे सौदागर अश्या अनेक भागातील नागरिक वैतागले आहे. त्यामुळे आपल्या पिंपरी चिंचवड शहरी भागातील पबवरती पोलीसांकडून त्वरित कायदेशीर कारवाई केली पाहिजे, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.