
पिंपरी (Pclive7.com): बारामती आणि पिंपरी-चिंचवड हे केवळ दोन भौगोलिक भाग नसून, एका अतूट नात्याने जोडलेले कुटुंब असल्याची भावना व्यक्त करत, स्व. अजितदादा पवार यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी पिंपरी-चिंचवडमध्ये भव्य ‘कृतज्ञता मेळावा’ आयोजित करण्यात आला आहे. हा मेळावा आज शनिवार, दि. १८ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता पिंपळे गुरव येथील नटसम्राट निळू फुले रंगमंदिर येथे पार पडणार आहे. बारामती मित्र मंडळ आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासात स्व. अजितदादा पवार यांचे योगदान मोलाचे असून, त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याच्या उद्देशाने हा मेळावा आयोजित करण्यात येत असल्याचे शहराध्यक्ष योगेश बहल यांनी सांगितले. दादांनी दिलेली विकासदृष्टी आणि सामान्यांसाठी लढण्याची जिद्द आजही जनमानसात जिवंत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

दरम्यान, बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी अजितदादा पवार या निवडणूक मैदानात उतरल्या असून, हा संघर्ष केवळ राजकीय नसून दादांच्या विकास परंपरेला पुढे नेण्याची भावनिक जबाबदारी असल्याचेही नमूद करण्यात आले.

या मेळाव्याला पिंपरी-चिंचवडमध्ये वास्तव्यास असलेल्या सर्व बारामतीकर बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष योगेश बहल यांनी केले आहे. तसेच हा मेळावा राजकीय नसून दादांप्रती असलेल्या प्रेम आणि कृतज्ञतेची भावना व्यक्त करण्याचे व्यासपीठ असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. बारामती मित्र मंडळाच्या वतीनेही सर्व नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून दादांच्या स्मृतींना अभिवादन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.






















Join Our Whatsapp Group