पिंपरी (Pclive7.com):- प्रभाग क्रमांक २६ मधील वाकड, विशाल नगर आणि पिंपळे निलख परिसरातील ४५ हून अधिक सार्वजनिक ठिकाणांना अधिकृत ओळख मिळावी, यासाठी महापालिकेच्या माध्यमातून नामफलक बसविण्यात यावेत, अशी मागणी नगरसेविका सौ. स्नेहा रणजित कलाटे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी महापालिकेच्या रायगड ‘ज’ क्षेत्रीय कार्यालयातील स्थापत्य विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना दोन स्वतंत्र निवेदने दिली आहेत.

वाकड, विशाल नगर आणि पिंपळे निलख परिसराचा झपाट्याने विकास होत असून, या भागात मोठ्या प्रमाणावर नागरी वस्ती आणि गृहप्रकल्प उभे राहिले आहेत. मात्र, अनेक कॉलनी, सोसायट्या, रस्ते आणि चौकांवर महापालिकेचे अधिकृत नामफलक नसल्यामुळे नागरिकांसह बाहेरून येणाऱ्यांना संबंधित ठिकाणे शोधताना अडचणींचा सामना करावा लागतो. ही समस्या दूर करण्यासाठी अधिकृत नामफलक बसविण्याची मागणी करण्यात आली आहे.

यामध्ये दत्त कॉलनी, रघुनाथ गेनबा नांदगुडे कॉलनी, गणपत गेणू धरपळे मार्ग, गुलमोहर पार्क, शांतिनिकेतन सोसायटी, गोपाळकृष्ण सोसायटी, गणेश नगर, विनायक नगर आणि क्रांती नगर यांसह विविध कॉलनी व सोसायट्यांचा समावेश आहे. तसेच टकले चौक, जगताप चौक, कस्पटे चौक, मानकर चौक, छत्रपती चौक, म्हातोबा चौक, उत्कर्ष चौक, जानोबा चौक आणि माऊली चौक या महत्त्वाच्या चौकांवरही नामफलक लावण्याची मागणी करण्यात आली आहे.
दुसऱ्या निवेदनात ज्ञानज्योती सावित्रीबाई ज्योतिबा फुले उद्यान, शहीद स्व. अशोक कामटे उद्यान, स्व. प्रभाकर नारायण साठे उद्यान, महापालिका शाळा, पंचशील बुद्धविहार, जेतवन बुद्धविहार, पिंपळे निलख स्मशानभूमी, वाकडगाव वैकुंठधाम तसेच श्री निळकंठेश्वर महादेव मंदिर, दत्त मंदिर, ग्रामदैवत श्री म्हातोबा मंदिर, हनुमान मंदिर, शीतळादेवी मंदिर आणि महालक्ष्मी मंदिर आदी सार्वजनिक व धार्मिक स्थळांवर नामफलक बसविण्याची मागणी करण्यात आली आहे.

नामफलकांमुळे नागरिकांची गैरसोय टळणार!
महापालिकेचे अधिकृत नामफलक बसविल्यास सार्वजनिक ठिकाणांची ओळख स्पष्ट होणार असून, नागरिकांना पत्ते शोधणे सोपे होईल. विशेषतः रुग्णवाहिका, अग्निशमन दल, टपाल, कुरिअर तसेच अन्य शासकीय व आपत्कालीन सेवांना संबंधित ठिकाणी पोहोचणे अधिक सुलभ होणार आहे. याशिवाय परिसरातील ऐतिहासिक, सामाजिक आणि धार्मिक स्थळांचे महत्त्वही अधोरेखित होईल.
संबंधित सर्व ठिकाणांची प्रत्यक्ष पाहणी करून महापालिकेच्या नियमांनुसार एकसमान रचना, योग्य आकारमान आणि स्पष्ट अक्षरांतील नामफलक तयार करावेत. हे नामफलक नागरिकांना सहज दिसतील अशा ठिकाणी बसवून आवश्यक कार्यवाही तातडीने पूर्ण करावी, अशी मागणी नगरसेविका स्नेहा रणजित कलाटे यांनी केली आहे.
“आपल्या परिसरातील प्रत्येक कॉलनी, चौक, उद्यान, शाळा आणि सार्वजनिक स्थळाला स्वतंत्र व अधिकृत ओळख मिळणे आवश्यक आहे. नामफलक ही केवळ नाव दर्शविणारी पाटी नसून नागरिकांच्या दैनंदिन सोयीसाठी आणि शहराच्या सुनियोजित विकासासाठी महत्त्वाची सुविधा आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन सर्व ठिकाणी अधिकृत नामफलक बसविण्याची कार्यवाही लवकरात लवकर करावी,” अशी भूमिका नगरसेविका स्नेहा रणजित कलाटे यांनी व्यक्त केली.

















Join Our Whatsapp Group