पिंपरी (Pclive7.com):- प्रभाग क्रमांक २६ (वाकड-पिंपळे निलख) परिसरातील स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनला असून, ठिकठिकाणी कचरा आणि अस्वच्छतेचे साम्राज्य निर्माण झाल्याच्या तक्रारी नागरिकांकडून होत आहेत. या पार्श्वभूमीवर नगरसेविका सौ. स्नेहा रणजित कलाटे यांनी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची भेट घेऊन स्वच्छता व्यवस्थेत तातडीने सुधारणा करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात त्यांनी आयुक्तांना स्वतंत्र निवेदने सादर केली आहेत.

प्रभागातील रस्ते, पदपथ, मंदिर परिसर, धार्मिक स्थळे, शाळा, बसथांबे तसेच नागरिकांची वर्दळ असलेल्या सार्वजनिक ठिकाणी नियमित झाडलोट होत नसल्याने कचरा व धुळीचे प्रमाण वाढत आहे. आरोग्य विभागाकडे आरोग्य निरीक्षक आणि सफाई कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असल्याने दैनंदिन स्वच्छता व्यवस्थेवर परिणाम होत असल्याचे कलाटे यांनी निवेदनात नमूद केले आहे. त्यामुळे आवश्यकतेनुसार अतिरिक्त सफाई कर्मचारी व आरोग्य निरीक्षकांची नियुक्ती करून स्वच्छतेच्या कामावर नियमित देखरेख ठेवावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

काही सोसायट्यांमध्ये कचरा संकलन करणारी वाहने वेळेत येत नसून, काही ठिकाणी सलग चार ते पाच दिवस कचरा उचलला जात नसल्याच्या तक्रारी आहेत. ग्रीन वेस्ट संकलनासाठीही पुरेशी वाहनव्यवस्था नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. तसेच स्विपिंग व्हॅनची सेवा नियमित आणि प्रभावीपणे मिळत नसल्याने रस्ते व पदपथांवरील स्वच्छतेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
संबंधित ठेकेदारांना निविदेतील अटींनुसार मंजूर मनुष्यबळ, वाहने आणि यंत्रसामग्री प्रत्यक्ष उपलब्ध करून दिली आहे का, याची तपासणी करावी. स्विपिंग व्हॅन निश्चित केलेल्या मार्गांवर नियमितपणे कार्यरत आहेत का, याची प्रत्यक्ष स्थळपाहणी करून अहवाल घ्यावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
वारंवार तक्रारी करूनही स्वच्छतेच्या कामात सुधारणा होत नसेल, तर संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि ठेकेदारांची जबाबदारी निश्चित करावी. कामात निष्काळजीपणा किंवा निविदेतील अटींचे उल्लंघन आढळल्यास कठोर प्रशासकीय व आर्थिक कारवाई करावी. वारंवार सूचना देऊनही कामात सुधारणा न करणाऱ्या अकार्यक्षम ठेकेदारांचे कंत्राट रद्द करून त्यांना नियमानुसार काळ्या यादीत टाकावे, अशी ठाम भूमिका स्नेहा कलाटे यांनी मांडली आहे.

वाढती लोकसंख्या आणि नागरिकांच्या गरजा लक्षात घेता प्रभागातील स्विपिंग व्हॅनची संख्या वाढविणे, पुरेसे सफाई कर्मचारी व आरोग्य निरीक्षक उपलब्ध करून देणे, कचरा आणि ग्रीन वेस्ट संकलनासाठी स्वतंत्र वाहनव्यवस्था उभारणे आवश्यक आहे. तसेच मंदिर परिसर, शाळा, बसथांबे आणि सर्व सार्वजनिक ठिकाणांची दररोज स्वच्छता होईल, असे निश्चित वेळापत्रक तयार करण्याची मागणी त्यांनी केली आहे. नागरिकांना स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी परिसर मिळणे हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे. त्यामुळे प्रशासनाने केवळ कागदोपत्री कार्यवाही न करता प्रत्यक्ष स्वच्छता व्यवस्थेत सुधारणा करून प्रभागातील नागरिकांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा नगरसेविका स्नेहा रणजित कलाटे यांनी व्यक्त केली आहे.


















Join Our Whatsapp Group