प्रसिद्ध गायक-गायिकांच्या सुमधुर स्वरांनी रंगणार दिवाळी पहाट; शत्रुघ्न काटे, उन्नती सोशल फाउंडेशन आणि अनिताताई काटे सोशल फाउंडेशनचा संयुक्त उपक्रम
पिंपरी (Pclive7.com):- दिवाळीच्या मंगलमय पर्वात पहाटेच्या प्रसन्न वातावरणात संगीताची सुरेल मेजवानी अनुभवण्याची संधी पिंपरी-चिंचवडकरांना मिळणार आहे. शत्रुघ्न काटे युथ फाउंडेशन, उन्नती सोशल फाउंडेशन आणि नगरसेविका सौ. अनिताताई संदीप काटे सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपळे सौदागर येथे ‘स्वरामृत दिवाळी पहाट २०२६’ या विशेष संगीत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार, ६ नोव्हेंबर आणि शनिवार, ७ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ वाजता हा कार्यक्रम रंगणार आहे. या संगीत मैफिलीत मराठी आणि हिंदी चित्रपटगीतांचा सुमधुर नजराणा रसिकांना अनुभवता येणार आहे.

पहिल्या दिवशी शुक्रवार, ६ नोव्हेंबर रोजी गायक मनोज, गायिका प्रज्ञा, गायक अतुल दिवे आणि गायिका भारती न्यायाधीश आपल्या सुरेल गायनाने रसिकांना मंत्रमुग्ध करणार आहेत. तर दुसऱ्या दिवशी शनिवार, ७ नोव्हेंबर रोजी गायिका सौ. शिल्पा आठले आणि गायक पं. यादवराज फड यांच्या गायनाची मेजवानी अनुभवायला मिळणार आहे.

पिंपळे सौदागर येथील शिवछत्रपती लिनिअर अर्बन गार्डन, गोविंद यशदा चौक येथे हा सोहळा पार पडणार आहे. दिवाळी पहाटेच्या प्रसन्न वातावरणात कर्णमधुर गीतांचा आनंद घेण्यासाठी नागरिकांनी आपल्या कुटुंबीयांसह आणि मित्रपरिवारासह मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

संगीत, संस्कृती आणि दिवाळीचा आनंद यांचा सुंदर संगम असलेला ‘स्वरामृत दिवाळी पहाट २०२६’ हा सोहळा पिंपरी-चिंचवडमधील संगीतप्रेमींसाठी खास पर्वणी ठरणार आहे.

















Join Our Whatsapp Group