कर्मचारी महासंघाच्या पंचवार्षिक कराराला यश; हजारो कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना आर्थिक दिलासा
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघाच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून, महापालिका कर्मचाऱ्यांना यंदा ८.३३ टक्के बोनस आणि ३० हजार रुपये सानुग्रह अनुदानाचा लाभ मिळणार आहे. महासंघ आणि महापालिका प्रशासन यांच्यात झालेल्या पंचवार्षिक करारामुळे कर्मचाऱ्यांच्या बोनस व सानुग्रह अनुदानाचा प्रश्न मार्गी लागला आहे.

महापालिका कर्मचाऱ्यांच्या आर्थिक हिताचे संरक्षण करण्यासाठी कर्मचारी महासंघाने प्रशासनासोबत सातत्याने चर्चा आणि पाठपुरावा केला होता. त्यातून पाच वर्षांसाठी बोनस आणि सानुग्रह अनुदानाबाबत करार करण्यात आला. या करारामुळे दरवर्षी बोनस आणि सानुग्रह अनुदानासाठी कर्मचाऱ्यांना नव्याने संघर्ष करण्याची गरज उरलेली नाही.

यंदाही या कराराची प्रभावी अंमलबजावणी होत असून, पात्र कर्मचाऱ्यांना ८.३३ टक्के बोनस आणि ३० हजार रुपये सानुग्रह अनुदान मिळत आहे. त्यामुळे महापालिकेतील हजारो कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक दिलासा मिळणार आहे.
या करारामुळे कर्मचाऱ्यांच्या आर्थिक हक्कांना स्थैर्य मिळाले असून, महासंघाच्या संघटित प्रयत्नांचे हे यश मानले जात आहे.

याबाबत महासंघाचे अध्यक्ष शशिकांत ऊर्फ बबनराव झिंजूर्डे म्हणाले की, “महापालिका कर्मचाऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी महासंघ सातत्याने संघर्ष करीत आहे. कर्मचाऱ्यांना मिळणारा बोनस आणि सानुग्रह अनुदान हा त्यांच्या हक्काचा तसेच महासंघाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचा विजय आहे. भविष्यातही कर्मचाऱ्यांच्या सर्व प्रश्नांसाठी महासंघ ठामपणे लढत राहील.”



















Join Our Whatsapp Group