पिंपरी (Pclive7.com):- पिंपरीतील शगुन चौक परिसरात पूजेच्या साहित्याच्या एका दुकानाला मध्यरात्री १२ वाजून ४९ मिनिटांच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत दुकानातील संपूर्ण साहित्य जळून खाक झाले असून मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. दरम्यान, आग विझविताना अग्निशमन दलाचे दोन कर्मचारी किरकोळ जखमी झाले आहेत.

घटनेची माहिती मिळताच पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या सहा अग्निशमन गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवले. त्यांच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली.

या आगीत दुकानातील पूजेचे साहित्य पूर्णपणे जळून खाक झाले. आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

दरम्यान, आग विझविण्याच्या मोहिमेदरम्यान अग्निशमन दलाचे दोन कर्मचारी किरकोळ जखमी झाले. त्यांना तातडीने वायसीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती फायर ऑफिसर गौतम इंगवले यांनी दिली.


















Join Our Whatsapp Group