रहाटणी-तापकीर नगरमधील नागरिकांना दिलासा; नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांच्या पाठपुराव्याला यश
पिंपरी (Pclive7.com):- रहाटणी-तापकीर नगर, प्रभाग क्रमांक २७ मधील गजानन नगर ‘ए’ कॉलनी परिसरात दूषित पाणीपुरवठ्याच्या समस्येवर अखेर उपाय करण्यात आला आहे. या परिसरातील जुन्या जलवाहिन्या बदलून नवीन जलवाहिनी टाकण्याचे काम पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून पूर्ण करण्यात आले आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

गजानन नगर ‘ए’ कॉलनी परिसरात वारंवार दूषित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. या समस्येची दखल घेत नगरसेवक तथा स्थायी समिती सदस्य बाबासाहेब त्रिभुवन यांनी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला.

आमदार शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली २० जुलै २०२६ रोजी महापालिका प्रशासनाला निवेदन देऊन जुन्या जलवाहिन्या बदलून नवीन जलवाहिनी टाकण्याची मागणी करण्यात आली होती. या मागणीची सकारात्मक दखल घेत महापालिका प्रशासनाने संबंधित परिसरात नवीन जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण केले आहे. त्यामुळे दूषित पाण्याच्या समस्येतून नागरिकांची सुटका होण्यास मदत होणार आहे.

दरम्यान, प्रभागातील इतर भागांमध्येही जुन्या जलवाहिन्यांमुळे पाणीपुरवठ्याच्या समस्या निर्माण होत असल्यास त्या सोडविण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा सुरूच ठेवणार असल्याचे नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांनी सांगितले. नागरिकांचे आरोग्य आणि मूलभूत सुविधांना प्राधान्य देत स्वच्छ व नियमित पाणीपुरवठ्यासाठी कटिबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

















Join Our Whatsapp Group