गॅस पाइपलाइनची कामे अर्धवट, तक्रारींकडे दुर्लक्ष; MNGL व्यवस्थापकीय संचालकांकडे सेवा सुधारण्याची मागणी
वाकड (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवडमधील वाकड परिसरात महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (MNGL) च्या भोंगळ कारभारामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. नवीन गॅस कनेक्शन, पाइपलाइनची कामे आणि तांत्रिक समस्यांबाबत वारंवार तक्रारी करूनही कंपनीकडून वेळेत प्रतिसाद मिळत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. अनेक ठिकाणी पाइपलाइनसाठी खोदकाम करून कामे अर्धवट सोडण्यात आल्याने रस्ते आणि पदपथांचीही दुरवस्था झाली आहे. या प्रकाराची गंभीर दखल घेत नगरसेविका स्नेहा रणजित कलाटे यांनी MNGL च्या व्यवस्थापकीय संचालकांना लेखी निवेदन दिले आहे. वाकड परिसरातील गॅस सेवा आणि पाइपलाइनच्या कामकाजात तातडीने सुधारणा करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

वाकड परिसरात मोठ्या प्रमाणावर गृहप्रकल्प आणि निवासी सोसायट्या असून लोकसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे अनेक सोसायट्यांकडून नवीन गॅस कनेक्शन आणि पाइपलाइन सुविधांची मागणी करण्यात येत आहे. मात्र, अर्ज करूनही वेळेत कार्यवाही होत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. काही ठिकाणी पाइपलाइनसाठी खोदकाम केल्यानंतर कामे अपूर्ण अवस्थेत सोडण्यात आली आहेत. याबाबत संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडे वारंवार पाठपुरावा करूनही समाधानकारक उत्तरे मिळत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.

निवेदनाद्वारे कलाटे यांनी प्रलंबित तक्रारींचे वेळबद्ध पद्धतीने निराकरण करावे, अर्धवट पाइपलाइनची कामे तातडीने पूर्ण करावीत, खोदकामामुळे खराब झालेले रस्ते आणि पदपथ पूर्ववत करावेत, तसेच वाकड परिसरासाठी स्वतंत्र जबाबदार अधिकारी आणि संपर्क क्रमांक उपलब्ध करून द्यावा, अशा मागण्या केल्या आहेत.
प्रत्येक तक्रारीच्या निवारणासाठी निश्चित कालमर्यादा ठरवून कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर संबंधित नागरिकांना माहिती द्यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. पाइपलाइनची कामे करणाऱ्या कंत्राटदाराकडे पुरेसे मनुष्यबळ आणि तांत्रिक क्षमता नसल्यास त्याच्यावर कारवाई करून सक्षम कंत्राटदाराची नियुक्ती करावी. तसेच नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून प्रशासकीय कारवाई करावी, अशी भूमिका कलाटे यांनी मांडली आहे.

“नागरिकांना मूलभूत सुविधा मिळवण्यासाठी वारंवार कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागणे योग्य नाही. MNGL सारख्या महत्त्वाच्या सेवा पुरविणाऱ्या संस्थेने नागरिकांच्या तक्रारींकडे गांभीर्याने पाहून तत्पर आणि जबाबदार सेवा देणे आवश्यक आहे. केवळ आश्वासने न देता प्रत्यक्ष कामातून सेवा सुधारणा दिसली पाहिजे,” असे नगरसेविका स्नेहा कलाटे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची तातडीने दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक निर्देश द्यावेत आणि करण्यात आलेल्या कार्यवाहीचा लेखी अहवाल द्यावा, अशी मागणीही त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

















Join Our Whatsapp Group