पिंपरी (Pclive7.com):- चिंचवड येथील चाफेकर चौक परिसरातील कुणाल मार्केट इमारतीच्या पार्किंगमध्ये लागलेल्या भीषण आगीत प्रसंगावधान राखत सुमारे ७० नागरिकांचे प्राण वाचविणाऱ्या कु. आर्या विजय कांबळे (वय २०) हिचा पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत विशेष सन्मान करण्यात आला.

कुणाल मार्केट इमारतीमध्ये सुमारे ४० दुकाने आणि ३८ सदनिका आहेत. पहाटे दीडच्या सुमारास इमारतीच्या पहिल्या मजल्यावर आग लागल्याचे लक्षात येताच आर्या हिने प्रसंगावधान राखून आरडाओरडा करत इमारतीतील नागरिकांना सावध केले. तसेच, नागरिकांना तातडीने टेरेसवर जाण्यास सांगितले आणि अग्निशमन विभागाला घटनेची माहिती दिली. काही मिनिटांत अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर टेरेसवर अडकलेल्या नागरिकांना शेजारील इमारतीत सुरक्षितपणे हलविण्यात आले. आर्याच्या धाडसामुळे आणि समयसूचकतेमुळे सुमारे ७० नागरिकांचे प्राण वाचविण्यात मदत झाली.
कु. आर्या कांबळे ही डी. वाय. पाटील इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी, आकुर्डी येथे डिझाइन विषयाच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत आहे. स्वतःचा जीव धोक्यात असतानाही इतर नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत तिने दाखविलेल्या धैर्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

यावेळी उमहापौर शर्मिला बाबर, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, शिवसेना गटनेते विश्वजीत बारणे, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. कुलदीप जंगम, तसेच अन्य पदाधिकारी, नगरसदस्य व अधिकारी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.
आर्या कांबळे हिने दाखविलेली धाडसी वृत्ती आणि सामाजिक बांधिलकी ही शहरातील नागरिकांसाठी प्रेरणादायी असून, तिच्या या कार्याचा महानगरपालिकेच्या वतीने गौरव करण्यात आला.


















Join Our Whatsapp Group