‘भक्ती-शक्ती संगम’ कार्यक्रमात अवधूत गांधी (आळंदीकर) यांचे विशेष सादरीकरण
पिंपरी (Pclive7.com):- दिवाळीच्या मंगलमय पर्वानिमित्त पुनावळे येथील पांढरे वस्ती, लक्ष्मी चौक येथे शनिवारी (दि.३१ ऑक्टोबर) ‘दिवाळी संध्या… भक्ती-शक्ती संगम’ या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्राच्या संतपरंपरेतील भक्तिरस आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा प्रेरणादायी जागर या कार्यक्रमातून अनुभवता येणार आहे.

या कार्यक्रमात ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’ आणि ‘शेर शिवराज’ या लोकप्रिय मराठी चित्रपटांतील गाजलेल्या गीतांचे गायक-अभिनेते मा. श्री. अवधूत गांधी (आळंदीकर) आणि त्यांचे सहकारी दमदार सादरीकरण करणार आहेत. संतवाणी, अभंग आणि छत्रपती शिवरायांच्या शौर्याची गीते यांचा अनोखा संगम यावेळी रसिकांना अनुभवायला मिळणार आहे. शनिवारी सायंकाळी ६ ते रात्री १० या वेळेत हा कार्यक्रम पार पडणार असून, दिवाळीच्या उत्सवी वातावरणात संगीत आणि भक्तिरसाची मेजवानी रसिकांना मिळणार आहे.

भारतीय जनता पार्टीचे पिंपरी-चिंचवड शहर उपाध्यक्ष श्री. राम हनुमंत वाकडकर आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळाचे माजी सभापती तथा संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्री. चेतन हुशार भुजबळ यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. महाराष्ट्राच्या समृद्ध संतपरंपरेचा गौरव आणि छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा जागर अनुभवण्यासाठी नागरिकांनी सहकुटुंब मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

















Join Our Whatsapp Group