पिंपरी (Pclive7.com):- रावेत परिसरातील सेक्टर २३ मधील सर्वे क्रमांक १५५, १५६, १५८ आणि १७७ येथे प्रस्तावित असलेल्या ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाला नगरसेविका ऐश्वर्या राजेंद्र तरस यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. या प्रकल्पामुळे नागरिकांच्या आरोग्यावर, पर्यावरणावर आणि परिसराच्या सुरक्षेवर संभाव्य परिणाम होऊ शकतात, अशी भूमिका मांडत त्यांनी पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त विजय सूर्यवंशी यांना निवेदन दिले आहे. तसेच, या प्रस्तावाचा पुनर्विचार करून प्रकल्प रद्द करण्याची मागणी केली आहे.

रावेत परिसरात नवीन ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव माध्यमांद्वारे समोर आल्यानंतर प्रभाग क्रमांक १६ मधील नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन आपण या प्रकल्पाला ठाम विरोध करीत असल्याचे तरस यांनी निवेदनात नमूद केले आहे.
मोशीतील प्रकल्पाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह..
मोशी येथे उभारण्यात आलेला वेस्ट टू एनर्जी प्रकल्प अद्याप अपेक्षित क्षमतेने आणि कार्यक्षमतेने सुरू झालेला नसल्याचा दावा ऐश्वर्या तरस यांनी केला आहे. या प्रकल्पातील तांत्रिक अडचणी, कार्यप्रणालीतील त्रुटी, पर्यावरणीय परिणाम आणि कचरा व्यवस्थापनासंबंधीचे प्रश्न पूर्णपणे सुटलेले नसताना दुसरा प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेणे योग्य नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. आधी मोशीतील प्रकल्पातील अडचणी दूर करून तो पूर्ण क्षमतेने, सुरक्षित आणि कार्यक्षम पद्धतीने सुरू करावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

ऑर्डनन्स फॅक्टरीमुळे सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर..
प्रस्तावित प्रकल्पाच्या परिसरात संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीतील देहूरोड ऑर्डनन्स फॅक्टरी असल्याचे नमूद करत तरस यांनी राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला आहे. हा परिसर संवेदनशील असल्याने प्रकल्प उभारण्यापूर्वी संरक्षण विभागाची भूमिका, सुरक्षा मानके आणि संभाव्य धोक्यांचा सखोल अभ्यास करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दुर्गा टेकडी आणि निवासी वसाहतींवर परिणाम होण्याची भीती..
प्रस्तावित प्रकल्पाच्या आसपास ऐतिहासिक दुर्गा टेकडी, वाढत्या निवासी वसाहती, शैक्षणिक संस्था आणि मोठ्या प्रमाणात लोकवस्ती आहे. अशा परिस्थितीत वायू प्रदूषण, दुर्गंधी, ध्वनी प्रदूषण, वाहतूक कोंडी तसेच नागरिकांच्या आरोग्यावर होणाऱ्या संभाव्य परिणामांचा व्यापक अभ्यास केल्याशिवाय प्रकल्प राबविणे जनहिताच्या विरोधात ठरू शकते, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.

पर्यावरणीय अहवाल सार्वजनिक करण्याची मागणी..
रावेत येथील प्रस्तावित प्रकल्पाची प्रक्रिया तातडीने स्थगित करावी, मोशीतील प्रकल्प पूर्ण क्षमतेने आणि सुरक्षितपणे सुरू झाल्यानंतरच नवीन प्रकल्पाचा विचार करावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. तसेच स्थानिक नागरिक, लोकप्रतिनिधी, पर्यावरण तज्ज्ञ आणि संरक्षण विभाग यांच्याशी सविस्तर चर्चा करून निर्णय घ्यावा, अशी सूचनाही त्यांनी केली आहे.
प्रकल्पाचा स्वतंत्र पर्यावरणीय व सामाजिक परिणाम अहवाल (EIA) सार्वजनिक करून नागरिकांच्या हरकती आणि सूचना मागवाव्यात, अशी मागणीही तरस यांनी केली आहे.
निर्णयाचा पुनर्विचार न केल्यास जनआंदोलन..
रावेत परिसरातील नागरिकांचे आरोग्य, पर्यावरण, सुरक्षा आणि जनहित लक्षात घेऊन महापालिकेने या प्रस्तावाचा गांभीर्याने पुनर्विचार करावा आणि प्रस्तावित वेस्ट टू एनर्जी प्रकल्प रद्द करावा. अन्यथा या ठिकाणी मोठे जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही नगरसेविका ऐश्वर्या राजेंद्र तरस यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.

















Join Our Whatsapp Group