पदवीधर मतदारसंघातील विजयाचा कोटा अद्याप निश्चित नाही
पुणे (Pclive7.com):- पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून, मतमोजणीला तब्बल १२ तास उलटूनही निकालाची प्रतीक्षा कायम आहे. मंगळवारी सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. मात्र, पदवीधर मतदारसंघातील वैध मतांची अंतिम आकडेवारी आणि विजयासाठी आवश्यक असलेला मतांचा कोटा निश्चित न झाल्याने निकाल लांबणीवर पडला आहे.

पदवीधर मतदारसंघासाठी एकूण २ लाख ४३ हजार ६११ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. सर्व मतपत्रिकांची छाननी आणि वैध मतांची निश्चिती झाल्यानंतरच विजयी उमेदवारासाठी आवश्यक असलेला मतांचा कोटा ठरविण्यात येणार आहे. त्यामुळे मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण होण्यास वेळ लागत असून, उमेदवारांसह त्यांच्या समर्थकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
दरम्यान, शिक्षक मतदारसंघातील ५३ हजार १८५ मतांपैकी ५१ हजार ५११ मते वैध ठरली आहेत. या मतदारसंघात विजयासाठी २५ हजार ७५६ मतांचा कोटा निश्चित करण्यात आला आहे. शिक्षक मतदारसंघातील पहिल्या पसंतीक्रमाच्या मतांची मोजणी सुरू झाल्याने आता निकालाबाबतच्या हालचालींना वेग येण्याची अपेक्षा आहे.

या निवडणुकीत पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर आणि सोलापूर या पाच जिल्ह्यांतील उमेदवारांचे भवितव्य मतपेट्यांमध्ये बंद आहे. निकालाची माहिती मिळविण्यासाठी उमेदवारांचे कार्यकर्ते आणि समर्थक सकाळपासूनच मतमोजणी केंद्राबाहेर थांबले आहेत. सलग १२ तास प्रतीक्षा करूनही निकाल जाहीर न झाल्याने केंद्राबाहेरील उत्सुकता आणि प्रतीक्षेचे वातावरण कायम आहे.
आता पदवीधर मतदारसंघातील वैध मतांचा कोटा कधी निश्चित होणार आणि शिक्षक मतदारसंघाच्या मतमोजणीत कोण आघाडी घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मतमोजणी पूर्ण झाल्यानंतरच या दोन्ही महत्त्वाच्या निवडणुकांचा अंतिम कौल स्पष्ट होणार आहे.


















Join Our Whatsapp Group