परिसर ‘संविधान सृष्टी’ म्हणून विकसित करण्याची मागणी
पिंपरी (Pclive7.com):- सांगवी येथील संविधान चौकातील संविधानाचे शिल्प भाजपने हटवल्याच्या निषेधार्थ सुरू असलेल्या आंदोलनाचा (दि.२६) पाचवा दिवस आहे. संविधान चौकात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याची, तसेच परिसराला ‘संविधान सृष्टी’ म्हणून विकसित करावे. याशिवाय, या चौकाला ‘विश्वरत्न परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक’ असे नाव देण्यात यावे, अशीही मागणी काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांनी केली आहे.

या आंदोलनात संविधानवादी कार्यकर्ते, आंबेडकरवादी नागरिक, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि सर्वसामान्य नागरिक सहभागी होत आहेत. संविधानाच्या सन्मानासाठी आणि संविधान चौकाच्या योग्य विकासासाठी नागरिक एकत्र येत आहेत.
यावेळी बनसोडे म्हणाले की, भाजपच्या नगरसेविका तृप्ती कांबळे आणि पती संतोष कांबळे यांनी संविधान शिल्प उध्वस्त करून अतिशय चुकीचे काम केलेले आहे. धम्मचक्र परिवर्तन दिन माहित नसेल तर तुम्ही स्वतःला संविधानवादी आणि आंबेडकरवादी कशाला म्हणून घेता? तुम्ही भाजप वादी मनूवादी आहात. महानगरपालिकेच्या वतीने गुन्हा दाखल करण्यात आला नसून तो वैयक्तिक आहे. भविष्यात फिर्यादीने गुन्हा मागे घेतल्यास या प्रकरणाला काहीही अर्थ राहणार नाही. त्यामुळे खाजगी गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न करणार आहोत. इथे समाजकंटक येऊन आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. जर चूक झाली आहे तर दोन्ही पती-पत्नी समाजासमोर येऊन खुलासा का करत नाहीत. दुसऱ्या विरोधी संघटनांना आंदोलन करण्याची परवानगी पोलीस कसे काय देतात? या ठिकाणी वाद विवाद व्हावे अशी इच्छा पोलिसांची आहे का? पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी यांची भूमिका संख्यास्पद असून त्यामुळेच आरोपीला आजपर्यंत अटक केलेली नाही.

संविधान चौकातील काम २६ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्याची घाई कशासाठी? कोणत्याही सार्वजनिक कामासाठी प्रशासकीय प्रक्रिया, आवश्यक मंजुरी, कार्यादेश आणि कायदेशीर तरतुदींचे पालन करणे गरजेचे असते. मात्र, या प्रक्रियेची पुरेशी माहिती न घेता केवळ घोषणा करणे योग्य नाही.शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू असताना विकासकामांच्या घोषणांची व्यवहार्यता तपासणे आवश्यक आहे. महानगरपालिकेची प्रशासकीय यंत्रणा, नवीन कामासाठी आवश्यक असलेली प्रक्रिया आणि आचारसंहितेचे नियम यांची लोकप्रतिनिधींना माहिती असली पाहिजे.
सांगवीतील संविधान चौकात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा आणि या चौकाला पुढील काळात ‘विश्वरत्न परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक’ असे नाव देण्यात यावे.तसेच या परिसरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD) क्वार्टर्सच्या भिंतीचा उपयोग करून त्या ठिकाणी संविधानातील मूल्ये, तत्त्वे आणि महत्त्वाच्या तरतुदी नागरिकांसमोर मांडण्यात याव्यात. या परिसराला ‘संविधान सृष्टी’ म्हणून विकसित करून संविधानाच्या विचारांचा प्रसार करणारे कायमस्वरूपी स्मारक उभारण्यात यावे.संविधान सृष्टीच्या माध्यमातून नागरिकांना भारतीय संविधानाची माहिती सहजपणे मिळावी, यासाठी भिंतीवर संविधानाशी संबंधित म्युरल्स, शिल्पचित्रे आणि माहितीफलक बसवण्यात यावेत.

२६ नोव्हेंबर हा संविधान दिन असल्याने त्या दिवसाचे महत्त्व काँग्रेस पक्षाला मान्य आहे; मात्र कोणत्याही कामासाठी मनमानी पद्धतीने तारीख निश्चित करण्याऐवजी नियोजनबद्ध प्रशासकीय प्रक्रिया राबवावी.येत्या १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. या दिवसाचे औचित्य साधून संविधान चौकातील पूर्णाकृती पुतळा आणि संविधान सृष्टीच्या विकासाचे काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत.त्यासाठी आवश्यक नियोजन, खर्चाचे अंदाजपत्रक आणि प्रशासकीय प्रक्रिया वेळेत पूर्ण करणे गरजेचे आहे.महानगरपालिकेकडे संविधानातील महत्त्वाच्या कलमांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्याच्या विषयावर काँग्रेस पक्षाकडून स्वतंत्र लढा उभारण्यात येणार असून या लढ्याची पुढील दिशा आणि स्वरूप आगामी काळात जाहीर करण्यात येईल, असे बनसोडे यांनी सांगितले.



















Join Our Whatsapp Group