हजारो नागरिक रस्त्यावर उतरले; दुर्गा टेकडी वाचविण्यासाठी महापालिकेविरोधात आंदोलन
पिंपरी (Pclive7.com):- शहरातील दुर्गा टेकडी परिसरात प्रस्तावित वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाला रावेत, निगडी प्राधिकरण परिसरातील नागरिकांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. या प्रकल्पाऐवजी दुर्गा टेकडी परिसरात स्वर्गीय लोकनेते अजित पवार ऑक्सिजन पार्क उभारण्यात यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. दुर्गा टेकडी वाचविण्यासाठी रविवारी (दि.२५) संध्याकाळी हजारो नागरिक रस्त्यावर उतरले होते. यावेळी नागरिकांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रस्तावित प्रकल्पाविरोधात जोरदार आंदोलन केले.

दुर्गा टेकडी परिसरात वेस्ट टू एनर्जी प्रकल्प उभारल्यास परिसरातील पर्यावरणावर गंभीर परिणाम होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. या प्रकल्पामुळे हवेचे प्रदूषण वाढण्याची शक्यता असून, नागरिकांच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होऊ शकतो, अशी चिंता आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली. तसेच प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होण्याची शक्यता असल्याने टेकडीवरील नैसर्गिक संपत्ती आणि हरित क्षेत्राला धोका निर्माण होईल, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

दुर्गा टेकडी ही परिसरातील नागरिकांसाठी महत्त्वाची नैसर्गिक संपत्ती असून, तिचे संरक्षण करणे आवश्यक आहे. त्यामुळे महापालिकेने या ठिकाणी वेस्ट टू एनर्जी प्रकल्प उभारण्याचा निर्णय मागे घ्यावा आणि त्याऐवजी स्वर्गीय लोकनेते अजित पवार यांच्या नावाने ऑक्सिजन पार्क विकसित करावे, अशी मागणी नागरिकांनी केली.

दुर्गा टेकडीचे पर्यावरण जपून परिसरात हरित क्षेत्र वाढविण्यासाठी महापालिकेने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी भूमिका रावेत, निगडी प्राधिकरण परिसरातील नागरिकांनी आंदोलनातून मांडली.


















Join Our Whatsapp Group