पिंपरी (Pclive7.com):- वाकड येथील प्रिस्टीन प्रो लाईफ परिसरातील दुकानांना पहाटेच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. या आगीत सहा ते सात दुकाने आगीच्या विळख्यात सापडली. रहाटणी उप अग्निशमन केंद्राच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नसल्याची माहिती अग्निशमन विभागाने दिली.

अग्निशमन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, रहाटणी उप अग्निशमन केंद्राला पहाटे ३ वाजून ५६ मिनिटांनी उज्ज्वल गुप्ता यांनी आगीची वर्दी दिली. त्यानुसार अग्निशमन दलाचे जवान तातडीने प्रिस्टीन प्रो लाईफ, वाकड येथे दाखल झाले. घटनास्थळी पोहोचल्यानंतर सहा ते सात दुकानांना आग लागल्याचे निदर्शनास आले.

जवानांनी होज आणि होज रीलच्या साहाय्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यास सुरुवात केली. त्यानंतर अग्निशमन वाहनाच्या विंचच्या मदतीने दुकानांचे शटर तोडून आवश्यक त्या दुकानांमध्ये कूलिंग करण्यात आले. तसेच उर्वरित दुकानांवर पाण्याचा मारा करून आग पुन्हा भडकण्याचा धोका कमी करण्यात आला. आगीमुळे होणारे संभाव्य नुकसान वाढू नये, यासाठी जवानांनी सॅल्व्हेजिंगची प्रक्रिया राबवून घटनास्थळावरील धोका दूर केला.

या आग नियंत्रण मोहिमेत रहाटणी उप अग्निशमन केंद्राच्या जवानांना थेरगाव उप अग्निशमन केंद्र आणि मुख्य अग्निशमन केंद्राच्या वाहनांची मदत मिळाली.
अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नसल्याचे अग्निशमन विभागाने स्पष्ट केले.

















Join Our Whatsapp Group