महापालिका आयुक्तांना निवेदन, प्रकल्प दुसरीकडे स्थलांतरित करण्याची मागणी
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १५ मधील निगडी प्राधिकरण, सेक्टर क्रमांक २६ येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) सुमारे २५ एकर जागेवर प्रस्तावित करण्यात आलेल्या ‘वेस्ट-टू-एनर्जी’ प्रकल्पाला प्रभागाच्या चारही स्थानिक नगरसेवकांनी विरोध दर्शविला आहे. भौगोलिकदृष्ट्या ही जागा दुर्गादेवी टेकडी, आप्पूघर, निगडी जलशुद्धीकरण केंद्र आणि सेक्टर इस्कॉन रावेत परिसराच्या मध्यभागी येते. त्यामुळे प्रकल्प दुसरीकडे स्थलांतरित करण्याची मागणी नगरसेवकांनी निवेदनाद्वारे महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

उपमहापौर शर्मिला बाबर, नगरसेवक अमित गावडे, राजू मिसाळ, नगरसेविका शैलजा मोरे यांनी महापालिका आयुक्त विजय सूर्यवंशी यांना निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, सदर प्रस्तावित प्रकल्पाच्या अनुषंगाने निगडी प्राधिकरण, तसेच परिसरातील दाट लोकवस्ती असलेल्या भागातील नागरिकांमध्ये चिंता व नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक नागरिकांनी या प्रकल्पामुळे भविष्यकाळात उद्भवणाऱ्या पर्यावरणीय व आरोग्यविषयक समस्यांबाबत तक्रारी व हरकती व्यक्त केल्या आहेत.

दाट लोकवस्तीच्या मध्यभागी कचऱ्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प उभारल्यास भविष्यात गंभीर पर्यावरणीय व आरोग्यविषयक समस्या उद्भवू शकतात. कचरा हाताळणी, साठवणूक, वाहतूक आणि दहन प्रक्रियेमुळे दुर्गंधी, वाहतूक कोंडी यांसह हवा प्रदूषणाचा मोठा धोका निर्माण होऊ शकतो. विशेषतः कचरा वर्गीकरण आणि फिल्ट्रेशन व्यवस्था योग्य प्रकारे कार्यरत न राहिल्यास नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.

प्रस्तावित जागेच्या आसपास दुर्गादेवी टेकडी आणि आप्पूघरसारखी महत्त्वाची पर्यटन व मनोरंजनाची क्षेत्रे असून मोठ्या प्रमाणावर नागरी वस्ती आहे. यापूर्वी या परिसरात इन्व्हारमेंट सेंटर, सेंट्रल पार्क, अर्बन फॉरेस्ट विकसित करण्याची सूचना करण्यात आली होती. निगडी प्राधिकरण परिसरात मोठ्या प्रमाणावर नागरी वस्ती असून या भागात ज्येष्ठ नागरिक, लहान मुले तसेच विविध वयोगटातील नागरिक वास्तव्यास आहेत.
त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा,पर्यावरणाचा आणि जीवनमानाचा विचार करूनच अशा महत्त्वाच्या प्रकल्पाबाबत निर्णय घेणे आवश्यक आहे. स्थानिक नागरिकांचा तीव्र विरोध, परिसरातील दाट लोकवस्ती आणि संभाव्य पर्यावरणीय व आरोग्यविषयक परिणाम विचारत घेता, सेक्टर क्र.२६. निगडी प्राधिकरण येथील प्रस्तावित ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्प अन्य योग्य व लोकवस्तीपासून सुरक्षित अंतरावर असलेल्या जागेवर स्थलांतरित करण्याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी नगरसेवकांनी निवेदनातून केली आहे.



















Join Our Whatsapp Group