चिखली (Pclive7.com):- चिखलीतील कुदळवाडी ब्रिजजवळील साई बार अँड रेस्टॉरंट येथे जेवणाचे पार्सल घेण्यासाठी गेलेल्या रिक्षाचालकाला आणि त्याच्या दोन मित्रांना धक्का लागल्याच्या कारणावरून तीन अनोळखी व्यक्तींनी शिवीगाळ करत बेदम मारहाण केल्याची घटना घडली. आरोपींनी फिर्यादीच्या डोक्यात दगड आणि विटांनी मारहाण करून जखमी केले आहे. तसेच रिक्षाची काच फोडून नुकसान केले. याप्रकरणी चिखली पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभम जयदत्त काळे (वय ३२, व्यवसाय रिक्षाचालक, रा. घरकुल, चिखली, पुणे) हे २३ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास कुदळवाडी ब्रिजजवळील साई बार अँड रेस्टॉरंट येथे जेवणाचे पार्सल घेण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांच्यासोबत मित्र केतन गायकवाड आणि अविनाश दत्तात्रय हजारे हे देखील उपस्थित होते. या ठिकाणी तीन अनोळखी व्यक्तींनी धक्का लागल्याच्या कारणावरून फिर्यादी आणि त्यांच्या मित्रांशी वाद घातला. त्यानंतर आरोपींनी शिवीगाळ करत हाताने, लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. मारहाणीदरम्यान आरोपींनी दगड आणि विटांनी फिर्यादीच्या डोक्यावर गंभीर दुखापत केली. तसेच फिर्यादीच्या रिक्षाची काच फोडून नुकसान केले.

तीन अनोळखी आरोपींचा सहभाग
या प्रकरणातील पहिला आरोपी काळा-सावळ्या रंगाचा, सडपातळ बांध्याचा असून त्याने काळ्या रंगाचा शर्ट घातला होता. त्याचे वय अंदाजे १९ ते २० वर्षे आहे. त्याने फिर्यादीच्या डोक्यात दगड मारल्याचे तक्रारीत नमूद आहे. दुसरा आरोपी जाडसर बांध्याचा, उंच असून त्याची दाढी वाढलेली आहे. त्याचे वय अंदाजे ३० वर्षे असून त्याने पांढऱ्या रंगाचा शर्ट घातला होता. त्याने फिर्यादीला हाताने मारहाण करून खाली पाडत लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. तिसरा आरोपी जाडसर बांध्याचा, गोऱ्या रंगाचा असून त्याचे वय अंदाजे ३० वर्षे आहे. त्यानेही पांढऱ्या रंगाचा शर्ट घातला होता. त्याने फिर्यादीला हाताने मारहाण करून खाली पाडत लाथा-बुक्क्यांनी मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

या घटनेप्रकरणी चिखली पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तीन अनोळखी आरोपींविरोधात मारहाण, दुखापत आणि रिक्षाचे नुकसान केल्याप्रकरणी पोलिसांत तक्रार नोंदविण्यात आली आहे.


















Join Our Whatsapp Group