पुणे जिल्ह्यातील सुमारे ३५० सेविकांचा सहभाग; शंखवादन ठरले विशेष आकर्षण
पिंपरी (Pclive7.com):- राष्ट्र सेविका समिति, पुणे जिल्हा यांच्या वतीने सघोष पथसंचलन आणि शस्त्रपूजनाचा कार्यक्रम रविवार, २५ ऑक्टोबर २०२६ रोजी पिंपळे सौदागर येथे उत्साहात संपन्न झाला. संपूर्ण पुणे जिल्ह्यातून जवळपास ३५० सेविका या संचलनात उत्साहाने सहभागी झाल्या.

या कार्यक्रमाला राष्ट्र सेविका समितिच्या पश्चिम क्षेत्र कार्यवाहिका सुनंदाताई जोशी, प्रांत प्रचार प्रमुख मायाताई देशपांडे, पुणे विभाग कार्यकारिणी तसेच पुणे जिल्हा कार्यकारिणीचे पदाधिकारी उपस्थित होते. पुणे जिल्हा कार्यवाहिका भारतीताई तारे आणि प्रांत सहशारीरिक प्रमुख सायलीताई होमकर यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. तसेच आमदार उमाताई खापरे, माजी आमदार अश्विनीताई जगताप, नगरसेवक शत्रुघ्न काटे, नगरसेविका अनिताताई काटे, कुंदाताई भिसे यांच्यासह अनेक मान्यवरांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावली.

संचलनादरम्यान सेविकांनी शिस्तबद्ध पद्धतीने पथसंचलन केले. परिसरातील नागरिकांनी ठिकठिकाणी संचलनाचे उत्साहात स्वागत केले. नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि सेविकांचा उत्साह यामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे शंखवादन. शंखवादनामुळे कार्यक्रमाला पारंपरिक आणि वैशिष्ट्यपूर्ण स्वरूप प्राप्त झाले. सघोष पथसंचलन, शस्त्रपूजन आणि शंखवादनाच्या माध्यमातून राष्ट्र सेविका समितीच्या सेविकांनी एकजुटीचे आणि शिस्तीचे दर्शन घडविले.


















Join Our Whatsapp Group