पिंपरी (Pclive7.com):- मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील बहुचर्चित मिसिंग लिंक प्रकल्पावर १ नोव्हेंबर २०२६ पासून नवे वाहतूक नियम लागू करण्यात येणार आहेत. प्रवास अधिक सुरक्षित आणि गतिमान करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्राच्या अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) विभागाकडून २६ ऑक्टोबर रोजी यासंदर्भातील अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

नव्या नियमांनुसार, मिसिंग लिंकवर कार आणि खासगी हलक्या वाहनांसाठी ताशी १०० किलोमीटर, तर प्रवासी बससाठी ताशी ८० किलोमीटर वेगमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना निर्धारित वेगमर्यादेचे पालन करणे बंधनकारक असणार आहे.
मालवाहू वाहनांना पूर्ण प्रवेशबंदी..
मिसिंग लिंकवरील वाहतुकीच्या नियमांमध्ये महत्त्वाचा बदल करण्यात आला असून, सर्व प्रकारच्या मालवाहू वाहनांना या मार्गावर प्रवेशबंदी घालण्यात आली आहे. यामध्ये पिकअप व्हॅन, टाटा एस, ट्रक यांसह हलक्या मालवाहू वाहनांचा समावेश आहे.
याशिवाय, ज्वलनशील, स्फोटक आणि अन्य धोकादायक पदार्थांची वाहतूक करणाऱ्या वाहनांनाही मिसिंग लिंकवर प्रवेश करता येणार नाही. यापूर्वी काही हलक्या मालवाहू वाहनांना या मार्गावरून जाण्याची परवानगी होती. मात्र, नव्या अधिसूचनेनुसार अशा वाहनांनाही बंदी लागू करण्यात आली आहे.

मालवाहू वाहनांसाठी जुन्या मार्गिकेचा वापर..
मिसिंग लिंकवरील बोगद्यांची सुरक्षितता आणि तांत्रिक बाबी लक्षात घेऊन वाहतूक विभागाने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सर्व प्रकारच्या मालवाहू वाहनांना मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाच्या जुन्या मूळ मार्गिकेचाच वापर करावा लागणार आहे.
मिसिंग लिंकवर नव्या नियमांची अंमलबजावणी १ नोव्हेंबरपासून सुरू होणार असल्याने वाहनचालकांनी प्रवासाचे नियोजन करताना या बदलांची नोंद घ्यावी. निर्धारित वेगमर्यादेचे पालन करावे आणि प्रवेशबंदी असलेल्या वाहनांनी मिसिंग लिंकचा वापर टाळावा, असे आवाहन वाहतूक विभागाकडून करण्यात आले आहे.
बोगद्यांमधील सुरक्षितता, वाहतुकीचे नियमन आणि प्रवाशांचा सुरक्षित प्रवास यासाठी हे नवे नियम महत्त्वाचे ठरणार आहेत.


















Join Our Whatsapp Group