पिंपरी (Pclive7.com):- राज्य निवडणूक आयोगाच्या नावाचा आणि अशोक स्तंभ व राजमुद्रेचा बनावट लोगो तयार करून वाहनावर लावल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवडमध्ये दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शगुन चौक येथे पेट्रोलिंग दरम्यान पोलिसांनी एका महिंद्रा स्कॉर्पियो कारची तपासणी केली असता हा प्रकार उघडकीस आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शगुन चौक येथे पेट्रोलिंग सुरू असताना काळ्या रंगाची फिल्म लावलेली आणि नंबर प्लेट नसलेली महिंद्रा स्कॉर्पियो कार पोलिसांनी अडवली. वाहनाची तपासणी केली असता, कारच्या पुढील आणि मागील काचेवर अशोक स्तंभ व राजमुद्रा असलेला लोगो लावण्यात आल्याचे दिसून आले. या लोगोवर ‘राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र नगराध्यक्ष’ असे नमूद करण्यात आले होते.

सदर लोगो एडिट करून तयार करण्यात आल्याचे आणि त्याचा वापर बेकायदेशीरपणे करण्यात येत असल्याचे तपासात समोर आले. कारचालक वैभव प्रकाश वाव्हळे आणि त्याच्या कुटुंबातील कोणीही संवैधानिक किंवा कायदेशीर प्राधिकारी नसताना, सर्वसामान्य नागरिकांवर खोटा प्रभाव पाडण्याच्या उद्देशाने हा लोगो वापरत असल्याचे पोलिसांच्या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी पिंपरी वाहतूक विभागाचे पोलीस हवालदार अमोल बनसोडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कारचालक वैभव प्रकाश वाव्हळे आणि त्याचे वडील प्रकाश आबा वाव्हळे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ तसेच इतर संबंधित कलमान्वये पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या नावाचा आणि संवैधानिक चिन्हांचा गैरवापर करून नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याच्या या प्रकरणाचा पुढील तपास पिंपरी पोलिसांकडून करण्यात येत आहे.


















Join Our Whatsapp Group