पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी परिसरात अमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या दोन गुन्हेगारांना पकडण्यासाठी अमली पदार्थ विरोधी पथकाने रविवारी (२५ ऑक्टोबर) रात्री उशिरा सापळा लावला. एका गुन्हेगाराला पकडल्यानंतर पळून जाणाऱ्या दुसऱ्या गुन्हेगाराला पाठलाग करून पकडत असताना गुन्हे शाखेतील पोलीस कर्मचाऱ्याला हृदयविकाराचा धक्का बसला. त्यात त्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. यामुळे पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलावर शोककळा पसरली आहे. जावेद बागसिराज असे मृत्यू झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.

जावेद बागसिराज यांचे कुटुंब मूळचे कर्नाटक राज्यातील आहे. त्यांचे वडील पुणे शहरात आले होते. त्यांचा जन्म पुणे शहरात झाला. ते २०१० मध्ये पुणे शहर पोलीस दलात भरती झाले होते. सुरुवातीला आठ वर्ष पुणे पोलीस दलातील हडपसर, मुंढवा पोलीस ठाण्यांत सेवा केली. २०१८ मध्ये पिंपरी-चिंचवड शहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय सुरु झाल्यानंतर ते पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलात आले. इथे त्यांनी सुरुवातीला पिंपरी आणि त्यानंतर गुन्हे शाखेत काम केले. सध्या ते गुन्हे शाखेच्या अँटी नार्कोटिक्स सेल मध्ये कार्यरत होते.

रविवारी रात्री उशिरा जावेद यांना एक टीप मिळाली. संशयित दोघेजण संत तुकाराम नगर येथे एमडी ड्रग्ज विक्रीसाठी येणार आहेत. त्यानुसार त्यांनी वरिष्ठांना याबाबत माहिती देऊन संत तुकाराम नगर मधील आंतरिक सोसायटी जवळ सापळा लावला. एमडी विक्रीसाठी आलेल्या एकाला त्यांनी पकडले. दरम्यान, पकडलेल्या संशयित आरोपीचा दुसरा साथीदार पळून जाऊ लागला. त्याला पकडण्यासाठी जावेद हे त्याच्या मागे धावले. धावत असताना अचानक त्यांच्या छातीत तीव्र कळ आली आणि ते खाली कोसळले.
जावेद यांच्या सहकाऱ्यांच्या ही बाब लक्षात येताच त्यांना तात्काळ पिंपरी मधील वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच वेळी त्यांना आणखी एक हृदयविकाराचा धक्का बसला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. जावेद यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी, १२ वर्षांची एक मुलगी आणि ७ वर्षांचा एक मुलगा असा परिवार आहे. जावेद यांचा दफनविधी कसबा येथील कब्रिस्तान येथे सोमवारी दुपारी झाला. जावेद हे अतिशय कष्टाळू होते. त्यांचे काम वाखणण्याजोगे असल्याच्या भावना वरिष्ठ अधिकारी व्यक्त करत आहेत.

















Join Our Whatsapp Group