पिंपरी (Pclive7.com):- भीमाशंकरच्या जंगलात केवळ ३४ हजार नव्हे, तर तब्बल ९० हजार वृक्षांची कत्तल होणार असल्याचा खळबळजनक दावा माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केला आहे. तसेच भीमाशंकरप्रमाणेच राज्यातील २३ प्रकल्पांसाठी २३ वेगवेगळ्या ठिकाणी लाखो वृक्षांची कत्तल होणार असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. यासंदर्भातील कागदपत्रे कुंभार यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर (X) प्रसिद्ध केली असून, त्यामुळे वृक्षतोडीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

भीमाशंकर परिसरातील वृक्षतोडीच्या बदल्यात कोयना धरण परिसरातील दोन गावांमध्ये वृक्षलागवड करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात अद्याप एकही झाड लावण्यात आले नसल्याचा दावा विजय कुंभार यांनी केला आहे. त्याऐवजी संबंधित कंपनीने वृक्षलागवडीची जबाबदारी पार पाडण्याऐवजी ३ कोटी ८४ लाख रुपये दिल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
२३ प्रकल्पांमुळे लाखो झाडांवर कुऱ्हाड?
राज्यातील २३ प्रकल्पांसाठी विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होणार असल्याचा दावा कुंभार यांनी सादर केलेल्या कागदपत्रांच्या आधारे केला आहे. विकासाच्या नावाखाली होणाऱ्या वृक्षतोडीच्या बदल्यात पर्यायी वृक्षलागवड प्रत्यक्षात कितपत होते, तसेच त्यावर संबंधित यंत्रणांचे नियंत्रण आहे का, असे प्रश्न या प्रकरणामुळे उपस्थित होत आहेत.

वृक्षलागवडीच्या दाव्यांची पडताळणी होणार का?
वृक्षतोडीच्या बदल्यात वृक्षलागवड करण्याची अट असताना प्रत्यक्षात किती झाडे लावली गेली, त्यांचे संगोपन कसे झाले आणि त्यासाठी देण्यात आलेल्या निधीचा वापर कसा झाला, याची सखोल चौकशी करण्याची गरज आहे. विजय कुंभार यांनी प्रसिद्ध केलेल्या कागदपत्रांमुळे या संपूर्ण प्रक्रियेतील पारदर्शकतेबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत. माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केलेल्या या दाव्यांवर संबंधित प्रशासन आणि कंपनीची अधिकृत भूमिका समोर आल्यानंतरच प्रकरणातील वस्तुस्थिती स्पष्ट होऊ शकेल.

















Join Our Whatsapp Group