नगरसेवक कुणाल वाव्हळकर यांची आयुक्त विजय सूर्यवंशी यांच्याकडे मागणी
पिंपरी (Pclive7.com):- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ७ नोव्हेंबर हा शाळा प्रवेश दिन पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये ‘विद्यार्थी दिवस’ म्हणून साजरा करण्यात यावा, अशी मागणी नगरसेवक तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय)चे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष कुणाल वाव्हळकर यांनी महापालिका आयुक्त विजय सूर्यवंशी यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात सर्व शाळांना अधिकृत आदेश देण्याची विनंती त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ७ नोव्हेंबर १९०० रोजी सातारा येथील तत्कालीन गव्हर्नमेंट हायस्कूलमध्ये, म्हणजेच सध्याच्या छत्रपती प्रतापसिंह हायस्कूलमध्ये, इयत्ता पहिलीत प्रवेश घेतला होता. हा दिवस केवळ शाळा प्रवेशाचा नसून शिक्षण, ज्ञानसाधना आणि सामाजिक परिवर्तनाचा प्रेरणादायी संदेश देणारा ऐतिहासिक दिवस असल्याचे वाव्हळकर यांनी निवेदनात नमूद केले आहे.
आजच्या पिढीतील विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्याची, त्यांच्या संघर्षाची आणि शिक्षणाप्रती असलेल्या निष्ठेची माहिती मिळावी, तसेच विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये दरवर्षी ७ नोव्हेंबर रोजी ‘विद्यार्थी दिवस’ साजरा करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

या दिवशी शाळांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित वक्तृत्व, निबंध आणि चित्रकला स्पर्धा आयोजित कराव्यात. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करण्यासाठी ‘वाचन प्रेरणा’ उपक्रम राबवावा. तसेच महापालिकेच्या गुणवंत आणि गरजू विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करून त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन द्यावे, अशा सूचनाही वाव्हळकर यांनी केल्या आहेत.
‘विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची प्रेरणा निर्माण होईल’
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शाळा प्रवेश दिनाच्या आयोजनामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व समजेल, त्यांच्यामध्ये ज्ञानार्जनाची प्रेरणा निर्माण होईल आणि त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल, असा विश्वास वाव्हळकर यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने या मागणीची दखल घेऊन सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये ७ नोव्हेंबर हा दिवस ‘विद्यार्थी दिवस’ म्हणून साजरा करण्याबाबत अधिकृत आदेश काढावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.

















Join Our Whatsapp Group