पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड शहरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच पिंपरीतील शकुन चौक परिसरात सशस्त्र लुटीची घटना घडली आहे. दुकान बंद करून घरी जाणाऱ्या ४५ वर्षीय ड्रायफ्रूट व्यापाऱ्याला धारदार शस्त्राचा धाक दाखवून पाच अज्ञात तरुणांनी तब्बल चार लाख रुपयांची रोकड आणि दुचाकी लुटून नेली. गुरुवारी (दि.२९ ऑक्टोबर) रात्री घडलेल्या या घटनेमुळे व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे.

किशन धामेजा असे लुटीला बळी पडलेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. ते दुकान बंद करून घरी जात असताना दुचाकीवरून आलेल्या पाच अज्ञात तरुणांनी त्यांना अडवले. त्यानंतर धारदार शस्त्राचा धाक दाखवून त्यांच्याकडील चार लाख रुपयांची रोकड आणि दुचाकी जबरदस्तीने लुटून आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला.
या लुटीची संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात पाच अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, पिंपरी मार्केट परिसरात व्यापाऱ्यांना लक्ष्य करून घडलेल्या या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्रीच्या वेळी दुकान बंद करून घरी जाणाऱ्या व्यापाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, पोलिसांनी आरोपींचा तातडीने शोध घेऊन त्यांना अटक करावी, अशी मागणी व्यापारी वर्गातून होत आहे.

















Join Our Whatsapp Group